बीडमध्ये आईवर मुलाने विळ्याने केले वार; घटनेनंतर मुलाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती भांडणाच्या वादातून मुलाने आईवर विळ्याने मानेवर वार केला. बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथे ही घटना घडली. मुलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती गंभीर असून त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आईवर हल्ला करणाऱ्या मुलाचा मृतदेह मालीपारगाव शिवारातील शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याने आत्महत्या केली का त्याचा खून करण्यात आला, याबाबत तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथील पारूबाई मच्छिंद्र कदम (वय 50) व त्यांचा मुलगा बापू मच्छिंद्र कदम (वय 30) वर्षे यांच्यात घरगुती कारणावरून कुरबुरी होत होत्या. बुधवारी दुपारी 1.30 वाजता त्यांच्यात भांडण झाले, यावेळी संतापलेल्या मुलांने विळ्याने आईच्या मानेवर वार केला. त्यात पारुबाई गंभीर जखमी झाल्या असून त्यांना माजलगावच्या शासकीय रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. या घटनेने घाबरलेल्या बापू कदम या मुलाने मालीपारगाव येथील शिवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

मुलाची हत्या की आत्महत्या
बापू मच्छिंद्र कदम याने मालीपारगाव शिवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली की त्याचा कोणी खून केला, अशी परिसरात चर्चा आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. ही आत्महत्या नसून मुलाची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.