
कुरीअरच्या नावाखाली वृद्ध महिलेच्या घरात शिरून लुटमार करणाऱया टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट-11 ने उत्तर प्रदेश आणि भांडुप येथून अटक केली. अफजल अक्रम हुसैन, बरकतअली सलामत अली, सचिन सुनीलकुमार मिश्रा आणि अब्दुल मुनाफ मशरूफ मनीहार अशी या चौघांची नावे आहेत. त्या चौघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या मालाड येथे राहतात. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्या घरी होत्या. तेव्हा एक जण कुरीअरच्या नावाखाली महिलेच्या घरी आला. त्यानंतर तीन जण महिलेच्या घरात शिरले. महिलेला काही कळण्यापूर्वी आरोपीने महिलेचे हातपाय बांधून कपाटातील सोन्याचे दागिने आणि 1 लाख 80 हजार रुपये घेऊन पळ काढला. हा प्रकार स्थानिक रहिवाशांना समजताच त्याने याची माहिती मालाड पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. याचा समांतर तपास युनिट-11 करत होते.
तपासादरम्यान युनिट-11 ने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या गुह्यातील काही आरोपी हे उत्तर प्रदेशला पळून गेल्याची माहिती युनिट-11 ला मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकातील अधिकाऱयांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तिघांना उत्तर प्रदेश येथून तर एकाला भांडुप येथून अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी काही सोने हस्तगत केले आहे. गुन्हा करण्यापूर्वी या टोळीने रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे. त्या चौघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
रेकी करून नंतर केली लुटमार
मालाड येथे भंगार विक्रीचे काम करणारा अब्दुलने महिलेच्या घरात पैसे असल्याची माहिती अफजलला दिली होती. त्यानंतर अफजल हा बरकत अली आणि अब्दुल हा घेऊन उत्तर प्रदेश येथून मुंबईत आला. त्याला सचिनने मदत केली. सचिन हा भांडुप येथे राहत असून त्याचा गारमेंटचा व्यवसाय आहे. लुटमारीच्या पैशातून त्या चौघांना काही रक्कम मिळणार होती.































































