
>>मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
चिल्लर हा तसा सर्वसामान्य शब्द असला तरी अनेक अर्थाने तो वापरला जात असतो. एखाद्याला तुच्छ लेखताना, ‘आमच्या भाऊसाहेबा समोर ते येडं चिल्लर हाय !’ असं सहज म्हटलं जातं. एखाद्या वास्तूला उगीचच मत्सरापोटी चिल्लरमध्ये जमा केलं जातं. हे चिल्लर आहे तरी काय? सरळ सरळ व्याख्या करायची झाली तर चिल्लर म्हणजे मोड! वेळेला चिल्लर मिळाली नाही तर फजितीची वेळ येऊ शकते! दहा रुपयांची भाजी घेऊन भाजीवाल्याला पाचशेची नोट दाखवली तर तो ज्या नजरेने तुमच्याकडे पाहतो ना, त्यावेळी शरमल्यासारखं होऊन जातं. त्याच्याही पुढे जाऊन तो रस्त्यावर बसलेला माणूस, ‘राहू द्या! घेऊन जा तशीच’ असं म्हणतो तेंव्हा चारचौघात कपडे काढल्यासारखी अपमानाची भावना झोंबायला लागते. असं असूनही या चिल्लरला मोडीत का काढलं जातं देव जाणे! चिल्लर खरी तर बहुगुणी असते. कुठेही उपयोगी पडते. एखादा विकलांग याचक समोर आला तर चिल्लर कामी येते. आता रुपया आठआण्याला किम्मत उरलेली नाही. पण खिशात पाच किंवा दहाची नोट असली तर दान केल्याचं पुण्य ही चिल्लर तुमच्या पदरात टाकून जाते.
एकेकाळी जेंव्हा चिल्लरचाच जमाना होता, तेंव्हा बर्याच घटना घडायच्या . समजा कीर्तन चालू आहे. त्यावेळी कीर्तन संपलं की थाळी फिरवली जायची. उद्देश हा असायचा की श्रोत्यांनी त्यात चाराठणे टाकावेत, जेणे करून बिदागी देता यावी. कुणी रुपया टाकायचा तर कुणी रुपयाचा बंदा टाकून आठ आणे उचलायचा! कांही बेरकी महाभाग थाळीत टिचकी मारून आठ आणे उचलून खिशात घालायचे! माझ्या लहानपणी तर माझ्यासकट सगळं चिल्लरच होतं. वडिलांना सिगारेटचं पाकीट आणायच तर ते पंचेचाळीस पैशांना मिळायचं, सिनेमा फर्स्टक्लास रुपया, सेपंड सत्तर पैसे, थर्ड चाळीस पैसे! गोडे तेल? वजनी पावणे तीन रुपये तर मापी अडीच रुपये. हॉटेलात राईसप्लेट सव्वा रुपया तर फुलजेवण अडीच रुपये! थोडक्यात शंभरेक रुपयात एखादं बर्यापैकी मोठं कुटुंब खाऊन पिऊन सुखी असायचं! आता नोटांचा काळ आलाय ! दहा रुपयांच्या आतल्या रकमेला कुणी भावच देत नाही! बँकेत असताना एकदा माझ्या लक्षात आलं की एक दोन तीन पैशांची नाणी खूप जमा झाली आहेत. एकदा ती मोजून रुमालात बांधून त्याचे गाठोडे तयार केले. ते दहा रुपयांचं भरलं. तेवढे पैसे टाकून ते गाठोड ताब्यात घेतलं आणि प्रवासात असताना एका गरीबाला ते दिलं. तोही हरखला. पुन्हा पुन्हा नमस्कार करत गेला. गाडी अजून स्टेशनात असतानाच तो घाईने परत आला. माझ्या हातात गाठोडे ठेवून म्हणाला, ‘हे पैशे चलनात! असले तर रूपाय आठ आने द्या साहेब!’ मी त्याला रुपया दिला आणि ते गाठोडे नदीला अर्पण करून टाकले! तेवढेच पुण्य!
चिल्लर आणि खुर्दा हे लंगोटीयार! जसे गावांच्या नावात ‘बुद्रुक’ आणि ‘खुर्द’ असतं तसं. गावाचं नाव तेच असलं तरी बुद्र्क मोठं आणि खुर्द छोटं ड चुकभुल देणे घेणे ़ . तसं चिल्लर छोटी आणि खुर्दा मोठा! खुर्दा आता कालबाह्य झाला असला तरी चिल्लर अजून आपला मान राखून आहे! कोणे एकेकाळी जेंव्हा मी आमच्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसायचो तेंव्हा चिल्लरची भीषण टंचाई होती. तेंव्हा आम्ही दहा वीस पैसे लिहिलेले खपटाचे तुकडे करून ग्राहकांना द्यायचो. थोडक्यात ही पर्यायी अर्थव्यवस्थाच होती ! पेंव्हाही या आणि तेवढया तुकडयांचे पैसे घेऊन जा! एका गृहस्थानं दोन वर्षांनंतर हे खपटाचे तुकडे देऊन राईसप्लेट वर हक्क सांगितल्याची एक अंधुक आठवण आहे! या पार्श्वभूमीवर एक आठवण . एकदा एक अंगावर लक्तर असलेला भिकारी आला.
‘चिल्लर घेताव का ?’
मला त्याच्या रूपात देवदूत दिसला!
‘किती आहे ?’
त्याने झोळीत हात घालून थैली काढली. आणि गल्ल्यावर ओतली. तो चिल्लरचा ढिगारा मला अवाक करून गेला. मोजून हैराण होऊन गेलो. दोनशे रुपये! साठच्या दशकात! मी थक्क होऊन त्याच्याकडे पहात राहिलो!
‘पैशे देताव नव्ह?’
मी गुपचुप त्याला शंभराच्या दोन नोटा दिल्या . त्यानं ते झोळीत टाकले.
‘दोन दिसांनी आलं तर चालल का?’
‘कशाला?’
‘चिल्लर द्यायला! ’
त्या क्षणी त्याने मला चिल्लर मध्ये जमा करून टाकले होते!





























































