
घराबाहेर बसलेल्या 10 वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्याचा सोलापूरच्या एका तरुणाचा प्रयत्न फसला. अनोळखी व्यक्ती हात पकडून घेऊन जात असल्याचे लक्षात येताच मुलाने आरडाओरड करत त्या व्यक्तीचा हात झटकून पळ काढला. परिणामी परिसरातील नागरिकांनी सदाशिव शिंगटे (30) या तरुणाला पकडले.
परळ येथे राहणारे अनिल गुप्ता हे हातगाडीवर सरबत विक्रीचा धंदा करतात. ते त्यांची पत्नी, लहान मुलगी व मुलासोबत राहतात. मंगळवारी रात्री गुप्ता यांचा दहा वर्षांचा मुलगा जेवण करून घराबाहेर बसला होता. त्यावेळी तेथे आलेल्या सदाशिव याने मुलाला तिकडे चल असे बोलून हाताला पकडले व घेऊन जाऊ लागला. त्याने रस्ता ओलांडून टेम्पोच्या मागे मुलाला घेऊन जाऊ लागला. तेव्हा काहीतरी काळेबेरे वाटल्यामुळे मुलाने त्याचा हात झटकला व आरडाओरड करू लागला. तेव्हा तेथे असलेल्या रमेश वाल्मीकी याने सदाशिवला पकडले आणि त्याला ओळखतो का असे मुलाला विचारले. मुलाने ओळखत नसल्याचे सांगताच नागरिकांनी पोलिसांना बोलावून सदाशिव शिंगटे याला त्यांच्या ताब्यात दिले.

























































