
संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बदललेला सूर पाहायला मिळाला. एरव्ही उठता बसता देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर टीका करणाऱ्या मोदींनी चक्क पंडित नेहरूंवर स्तुतीसुमने उधळली. त्याचबरोबर गेली साडेनऊ वर्षे पत्रकारांना एकदाही पत्रकार परिषदेद्वारे सामोरे न गेलेल्या मोदींनी संसदेचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांचे तोंडभरून कौतुक केले.
संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस गदारोळाने सुरू झाला. तांत्रिक चुकीचा मुद्दा लावून धरत काँग्रेसच्या गौरव गोगई यांनी लोकसभेत सरकारला धारेवर धरले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी जी-20 बैठकीच्या निमित्ताने देशाने मिळविलेल्या यशाची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर लोकशाहीच्या पंचाहत्तर वर्षांच्या वाटचालीच्या अनुषंगाने सभागृहात चर्चा सुरू झाली त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने झाली.
आजचे नरेंद्र मोदींचे भाषण हे वेगळे ठरले. त्यात राजकीय अभिनिवेश आणि प्रचार फारसा नव्हता. त्याचे कारण म्हणजे मागच्या पंचाहत्तर वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेताना मोदींना काँग्रेस राजवटीचे योगदानही नाकारता येणार नव्हते. ते खुबीने मांडत त्याला भावनिकतेची जोड देत नरेंद्र मोदी यांनी, जुने संसद भवन हे येणाऱया कित्येक पिढय़ांना प्रेरणा देत राहील, अशी ग्वाही दिली. संसदेच्या आजवरच्या वाटचालीत 7500 खासदारांनी प्रतिनिधित्व केले त्यात सहाशेपेक्षा अधिक महिला खासदार राहिल्या आहेत असे सांगत पंडित नेहरू ते अटलजींपर्यंतच्या पंतप्रधानांनी देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्याचबरोबर लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर ते ओम बिर्ला या प्रवासावरही भाष्य केले.
मोहित करणारी वास्तू
अटलजींनी छत्तीसगड व झारखंडची निर्मिती याच संसदेत केली त्यावेळी जल्लोष झाला. मात्र काँगेसने आंध्र व तेलंगणाची निर्मिती केल्यानंतर गोंधळ झाला, असा टोलाही मोदींनी लगावला. या संसदेने आजवर आनंदाचे, संघर्षाचे, गोंधळाचे, मैत्रीचे अनेक प्रसंग पाहिले. मात्र, पंडित नेहरू व लालबहादूर शास्त्राी यांच्या निधनानंतर संपूर्ण संसद अश्रूंनी ओथंबल्याचे चित्रही या देशाने पाहिले. संसदेच्या या इमारतीचा इतका लळा लागतो की तीस वर्षांपूर्वी खासदार राहिलेली मंडळीदेखील सेंट्रल हॉलमध्ये गप्पा मारण्यासाठी येतात, इतकी मोहित करणारी ही वास्तू आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. संसदेचे रिपार्ंटग करताना संपूर्ण आयुष्य वाहून घेणारे पत्रकारही आहेत. त्यांच्यासाठी हा निश्चितच भावूक क्षण असेल, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
सर्वात तरुण खासदार व वयोवृद्ध खासदारही
या सभागृहात सर्वात तरुण 25 वर्षीय मूर्मू नावाच्या महिला खासदार आहेत तर मजुबीर रहिम हे 93 व्या वर्षीही या सभागृहातील चर्चेत समरसून भाग घेतात, हे हिंदुस्थानच्या लोकशाहीचे यश आहे, असेही त्यांनी सांगितले. लोकसभेत 43 वर्षे प्रतिनिधित्व करणारे दिग्गज नेते कॉम्रेड इंद्रजित गुप्ता यांचाही पंतप्रधानांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला.
दिनेश शर्मांचा शपथविधी
जुन्या संसद भवनातील कामकाजाच्या अखेरच्या दिवशी भाजप नेते व उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी शपथ घेतली. शर्मा हे नुकतेच राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत जिंकून आले आहेत. आज राज्यसभेच्या कामकाजाचा संसदेच्या जुन्या इमारतीमधील अखेरचा दिवस. आजच्या कामकाजाची सुरुवातच शर्मांच्या शपथविधीने झाली.
पंतप्रधानांनी मणिपूरचा दौरा करावा; खरगेंची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचा दौरा करावा, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राज्यसभेत केली. लोकशाहीच्या 75 वर्षांच्या वाटचालीवरील चर्चेत सहभागी होताना खरगे यांनी, देशासाठी तुरुंगवास भोगलेल्या पंडित नेहरूंचाही दाखला दिला. विरोधक सक्रियपणे विरोध करत नसतील तर आपल्या यंत्रणेत काही दोष आहे, असे नेहरू मानत असत, मात्र सध्या विरोधकांनी विरोध करू नये यासाठी ईडी व सीबीआयचा आधार घ्यावा लागतो, असा टोलाही खरगेंनी लगावला. हा देश स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांना वाटायचे की अडाणी माणसे अंगठेबहाद्दर लोक देश कसा काय चालवणार? मात्र, हा देश नुसता चालला नाही तर विकासाच्या मार्गावर धावला. या देशाला पंडित नेहरूंनी विकासाची दिशा दिल्याचेही खरगेंनी ठणकावून सांगितले.




























































