
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर आगामी काळात अजून काही नेते काँग्रेस सोडतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात आमदार प्रणिती शिंदे यांचंही नाव चर्चेत होतं. पण, प्रणिती शिंदे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला, ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. हे भाजपचं षडयंत्र आहे. ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून केवळ विरोधी नेत्यांवर वारंवार दबाव आणला जातो. त्यांना हेतुपूर्वक मानसिक त्रास दिला जातो. हे एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग आहे. त्यातून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावून स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. म्हणूनच अशोक चव्हाण यांनी त्रास वाचवण्यासाठी हतबल होत काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असं आमदार शिंदे म्हणाल्या.
विरोधी पक्ष संपवण्यासाठी आणि स्वतःचा एकमेव पक्ष राखण्यासाठी हे घृणास्पद प्रयत्न भाजपकडून होत आहेत. आपल्यासह इतर काही नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा सोडल्या जातात. हे काही नवीन नाही. परंतु आपण काँग्रेस सोडून भाजप किंवा अन्य कुठल्याही सोयीच्या पक्षात जाणार नाही. हा भाजपच्या मनाचा खेळ आहे. माझ्यावर कोणत्याही यंत्रणांचा दबाव नाही. आपले राजकारण ज्या मूलभूत मूल्यांवर आधारले आहे, ती मूलभूत तत्त्वे केवळ काँग्रेस पक्षाची आहेत. ती भाजपकडे अजिबात नाही. आपण काँग्रेसी जन्मले, काँग्रेसी म्हणून घडले आणि काँग्रेसी म्हणून मरेन, असं म्हणत आमदार शिंदे यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.



























































