
ऑस्ट्रेलियन ओपनच्या रात्रीने टेनिसइतिहासात पुन्हा एक हळवी रेघ ओढली. मेलबर्नच्या निळ्या कोर्टवर रविवारी अनुभवाचा किल्ला पुन्हा डगमगला आणि तरुणाईचा झेंडा पुन्हा ताठ मानेने उभा राहिला. पण या विजयाइतकाच, किंबहुना त्याहून अधिक, ही रात्र लक्षात राहील ती नोव्हाक जोकोविचच्या रौप्य महोत्सवी ग्रॅण्डस्लॅम स्वप्नाच्या पुन्हा एकदा अपूर्णतेमुळे. स्पेनच्या 22 वर्षीय कार्लोस अल्काराजने ग्रॅण्डस्लॅम कारकीर्दीतील चौथेही म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपनही जिंकत करियर ग्रॅण्डस्लॅम पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा अल्काराज आठवाच टेनिसपटू ठरला.
अनुभवाचा पहिला वार, तरुणाईचे प्रत्युत्तर
सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये जोकोविचने 6-2 अशी आघाडी घेत अनुभवाचा दरारा दाखवला. क्षणभर असे वाटले की इतिहास आज साक्षीदार ठरणार. पंचविसावे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद, टेनिसमधील सुवर्ण मुकुट, जोकोविचच्या शिरपेचात अडकणार. पण खेळाला वेगळीच पटकथा हवी होती.
दुसऱया सेटपासून अल्काराजने गिअर बदलला. त्याने 6-2 असा सेट जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱया सेटमध्ये जोकोविचच्या पावलांमध्ये क्षणभरचा थकवा दिसताच, अल्काराजने संधी साधली आणि 6-3 अशी आघाडी घेतली. चौथा सेट म्हणजे अनुभव विरुद्ध आक्रमकता यांचा श्वास रोखून धरणारे द्वंद्वयुद्ध. अखेरीस 7-5 अशी बाजी मारत अल्काराजने पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन किताबावर आपले नाव कोरले.
इतिहासापासून एका पावलावर
अल्काराजसाठी हा क्षण आनंदाचा, तर जोकोविचसाठी वेदनेचा ठरला. जोकोचे ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद निसटले आणि त्याचसोबत 25 व्या ग्रॅण्डस्लॅमचे स्वप्नही पुन्हा एकदा लांबणीवर पडले. आजही जोकोविचकडे 24 ग्रॅण्डस्लॅमच आहेत. टेनिस इतिहासातील सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅमचा विक्रम मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर असलेला 24 चा आकडा तो अजून ओलांडू शकलेला नाही. इतिहासाच्या उंबरठय़ावर उभा असलेला हा महान खेळाडू, पुन्हा एकदा रिकाम्या हाताने परतला.
अल्काराजचा एल्गार, पण आदरही मोठा
गेल्या वर्षी अंतिम फेरीत अपयश आलेल्या अल्काराजने यंदा कोणतीही चूक केली नाही. उपांत्य फेरीत झ्वेरेव्हला पराभूत करत त्याने अंतिम फेरी गाठली आणि जोकोविचसारख्या दिग्गजाला नमवले. हा सामना ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासातील सर्वात स्फोटक लढतींपैकी एक ठरला. त्याने आपल्या सहा वर्षांच्या छोटय़ाशा कारकीर्दीतच चारही ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला. याआधी डॉन बज, रॉड लेव्हर, रॉय एमरसन, फ्रेड पेरी, राजॅर फेडरर, नदाल, जोकोविच यांनी हा पराक्रम केला होता.
जेतेपदानंतर तो थांबला
विजयानंतरही अल्काराज थांबला. त्याने जल्लोष केला नाही. तो थेट जोकोविचकडे वळला. तेव्हा त्याच्या डोळ्यांत आदर आणि शब्दांत कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. नोव्हाकला उभे राहून टाळ्या मिळायलाच हव्यात. त्याच्यासोबत कोर्ट आणि लॉकररूम शेअर करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे, असे म्हणत त्याने आपल्या विजयालाच नम्रतेची किनार दिली. दुसरीकडे, पराभवाच्या वेदनेतही जोकोविच मोठा ठरला. अभिनंदन कार्लोस. तू खूप तरुण आहेस. तुझ्याकडे अजून भरपूर वेळ आहे. त्याचा योग्य उपयोग कर, असे म्हणत त्याने प्रतिस्पर्ध्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
मेलबर्नच्या आजच्या रात्रीने केवळ विजेता दिला नाही. तिने दिली एक हळवी जाणीव. महानतेच्या शिखरावर पोहोचणे जितके कठीण, तितकेच त्या शिखरावरून इतिहास घडवण्याची संधी हातातून निसटणे वेदनादायी असते.




























































