भाईंदरचा महापौर मराठीच हवा; मराठी एकीकरण समितीचा आज मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने डिंपल मेहता यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र आम्हाला मराठीच महापौर हवा. मीरा-भाईंदरमध्ये घराणेशाही नाही तर मराठीशाही चालणार, असा आवाज देत मराठी एकीकरण समितीने मेहता यांच्या नावाला विरोध केला आहे. भाईंदरचा महापौर मराठीच हवा या मागणीसाठी उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता मराठी एकीकरण समितीच्या वतीने महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात तमाम मराठी बांधवांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने ७८ जागा मिळवून एकहाती सत्ता काबीज केली आहे. मात्र उद्या होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मराठी उमेदवार न देता डिंपल मेहता यांचा अर्ज दाखल केल्याने शहरातील मराठीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मराठी एकीकरण समितीने तर ‘राज्य मराठी.. शहर मराठी.. महापौर मराठीच..’ असे शहरात ठिकठिकाणी फलक लावले असून ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकीकरण समितीने मराठीद्वेष्ट्या भाजपच्या विरोधात मोठे आंदोलन उभारले असून उद्याच्या होणाऱ्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मेहता यांचा डाव हाणून पाडू

भाईंदरवासीयांना मराठी महापौर द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा यापूर्वीच मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला होता. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा विषय नसून मराठी माणसांचा विषय आहे. शहराचे मराठीपण टिकवण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात आले आहे. मुंबई गुजरातला मिळावी असे स्वप्न मोरारजी देसाई यांनी बघितले होते. तसाच प्रयत्न भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे बघत असून त्यांचा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा गोवर्धन भगत यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिला.