
खरा नेता ‘सरेंडर’ होत नाही, तर तो युद्धकाळात खंबीरपणे उभा राहतो. एका मुलाने खामेनी यांना विचारले, ‘‘मला देशासाठी बलिदान करायचे आहे.’’ खामेनींचे उत्तर होते, ‘‘पोरा, आधी शिक. वैज्ञानिक हो. जीवन जग. मरायची इतकी घाई करू नकोस. गरज पडली तर देशासाठी मरण पत्करण्यास आम्ही सगळे आहोत.’’ खामेनी यांनी शब्द खरा केला. अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात ते घेरले गेले, पण पलायन केले नाही. त्यांच्या निधनाने इराणमध्ये 40 दिवसांचा शोक पाळला जाईल. भारताने त्याचा सच्चा मित्र गमावला. त्या बदल्यात तासाभराचा तरी शोक पंतप्रधान मोदी पाळतील काय? की प्रे. ट्रम्प व नेतान्याहूला काय वाटेल, या भयाने ते मौनातच राहतील!
अयातुल्लाह खामेनी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. प्राण वाचविण्यासाठी त्यांनी कोणापुढे गुडघे टेकले नाहीत. देश सोडला नाही. बंकरमध्ये लपले नाहीत. कोणत्याही दुसऱ्या देशाकडे मदत मागितली नाही. देशाच्या जनतेशी विश्वासघात केला नाही. महासत्ता आणि संघर्ष यामध्ये ठामपणे उभे राहिले व बलाढ्य शक्तींशी लढताना आपल्या प्रिय इराण देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. खामेनी यांचे हौतात्म्य जग प्रदीर्घ काळ लक्षात ठेवील. इतिहासात नोंद राहील. काही व्यक्ती पदांमुळे नाही, तर आपला स्वाभिमान व राष्ट्रभक्तीमुळे सदैव लक्षात ठेवल्या जातात. खामेनी अशा प्रखर स्वाभिमानी नेत्यांपैकी एक होते. इस्रायल आणि अमेरिकेने जगात संयुक्त झुंडशाहीची मोहीम उघडली. ती मानवतेसाठी घातक आहे. त्या मोहिमेत भारताचे नेतृत्व अप्रत्यक्षपणे सामील झाले. अमेरिका आणि इस्रायल त्यांच्या फायद्यासाठी एकत्र येतात व दुसऱ्या देशात अण्वस्त्र विकास कार्यक्रम सुरू असून आपल्याला त्यांच्यापासून धोका असल्याचे जाहीर करतात. प्रत्यक्षात त्या देशातील तेल, खनिज संपत्ती, व्यापार संधी गिळण्यासाठीच ते हा सर्व बनाव करतात. अमुक तमुक देशात लोकांचे हक्क मारले जात आहेत, लोकशाही धोक्यात आहे, असे बोंबलून अमेरिका त्या देशात सरळ हस्तक्षेप करते व शेवटी तेथील सरकार उलथवते. तेथील लोकांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्षांची हत्या करते. फासावर लटकवते किंवा व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे उचलून अमेरिकेच्या तुरुंगात टाकते. जे या झुंडशाहीस विरोध करतात, त्या विरोधात संघर्ष करतात, त्यांच्यावर युद्ध लादून तेथील ‘सुप्रीम लीडर’चा कुटुंबासह बळी घेते. इराणमध्ये तेच घडले आहे. इराणने त्यांचा अण्वस्त्र विकास कार्यक्रम गुंडाळावा यासाठी
अमेरिका आणि इस्रायलकडून
दबाव होता. इराण त्यासाठी तयार झाला तरीही इस्रायलच्या नेतान्याहूची ‘खाज’ म्हणून अमेरिकेने इराणवर हल्ले केले. क्रौर्य व अमानुषता अशी की, दक्षिण इराणमधील होर्मोझगान प्रांतातील मुलींच्या शाळेवर इस्रायलने बॉम्ब टाकले व त्यात शंभरावर कोवळ्या मुलांचा बळी गेला. इस्रायलने ‘गाझा’ प्रांतात असेच बॉम्ब टाकून पॅलिस्टिनी लोकांचा वंश नष्ट केला. लाखो लोक नाहक मारले गेले. ‘‘इराणकडे अण्वस्त्रे असता कामा नयेत. त्यामुळे संपूर्ण मानवतेला धोका निर्माण होणार आहे,’’ असे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू सांगतात, पण स्वतः त्यांच्या देशात अण्वस्त्रांचे साठे आहेत. चीन, रशिया, उत्तर कोरिया, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत. मग त्यांच्यावर जगाच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने किंवा इस्रायलने हल्ले केले नाहीत. ‘‘इराणच्या राजवटीकडून असलेला धोका नष्ट करून अमेरिकी जनतेचे संरक्षण करणे हा आमचा उद्देश आहे,’’ असे प्रे. ट्रम्प म्हणतात. हा शुद्ध भंपकपणा आहे. इराण, इराक, सीरिया, लिबियासारख्या राष्ट्रांकडून धोका आहे, अशी फौजदारी करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? लिबियाचा अध्यक्ष गदाफीला याच झुंड टोळीने मारले. सद्दामच्या देशात रासायनिक शस्त्रे असल्याचा कांगावा करून युद्ध केले व शेवटी सद्दामला फासावर लटकवून मारले. ती रासायनिक शस्त्रे काही शेवटपर्यंत मिळाली नाहीत. जे अमेरिकेच्या झुंडशाहीपुढे स्वाभिमानाने उभे राहतात त्यांच्यापासून जगाला आणि मानवतेला धोका असल्याची बोंब मारली जाते. भारताकडून जगाला, मानवतेला धोका नसावा. कारण भारताचे राज्यकर्ते प्रे. ट्रम्प यांच्या पुढे शरण झाले व इस्रायलच्या ताज्या दौऱ्यात नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींच्या गळ्यात एक ‘पदक’ लटकवून परत पाठवले. तेव्हापासून मोदी हे मौनात गेले व अमेरिका, इस्रायल
प्रचंड नरसंहार
करीत असताना विश्वगुरू गप्प बसले. कश्मीरप्रश्नी इराणने भारताला उघड साथ दिली. भारताला सगळ्यात स्वस्त दरात तेल दिले. दोस्ती निभावली. भारताला इज्जत दिली, पण आम्ही इराणच्या संकटकाळात ठामपणे उभे राहिलो नाही. कारण इस्रायलने भाजप व मोदींना ईव्हीएम घोटाळ्याचा मंत्र दिला. लोकांचा पाठिंबा नसतानाही सत्तेवर कसे टिकून राहायचे याचे ‘विज्ञान’ दिले. विरोधकांवर हेरगिरी करणारे पेगासस तंत्र दिले. भारताने रशियासह अनेक परंपरागत मित्र गमावले. त्यात इराणचा समावेश आहे. इराण जागतिक गुंडांविरुद्ध एकाकी लढत राहिला. ज्यांचे अमेरिकेशी वैर आहे असे रशिया, उत्तर कोरिया, चीनसारखे देशही तटस्थ राहिले किंवा पोकळ धमक्या देत राहिले, पण 86 वर्षांचा म्हातारा खामेनी रमजानच्या महिन्यात आपल्या देशासाठी हुतात्मा झाला. खामेनी आज जिवंत नाहीत, पण ते जिवंत असताना कसे शौर्याने व स्वाभिमानाने जगले यावरच जगात चर्चा होईल. देशाचा स्वाभिमान गहाण पडेल असा कोणताही करार करण्यास खामेनी यांनी नकार दिला. आपल्या लोकांसाठी व देशासाठी कसे लढायला हवे, याचा धडा जगाला देऊन या योद्ध्याने हौतात्म्य पत्करले. खरा नेता ‘सरेंडर’ होत नाही, तर तो युद्धकाळात खंबीरपणे उभा राहतो. एका मुलाने खामेनी यांना विचारले, ‘‘मला देशासाठी बलिदान करायचे आहे.’’ खामेनींचे उत्तर होते, ‘‘पोरा, आधी शिक. वैज्ञानिक हो. जीवन जग. मरायची इतकी घाई करू नकोस. गरज पडली तर देशासाठी मरण पत्करण्यास आम्ही सगळे आहोत.’’ खामेनी यांनी शब्द खरा केला. अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात ते घेरले गेले, पण पलायन केले नाही. त्यांच्या निधनाने इराणमध्ये 40 दिवसांचा शोक पाळला जाईल. भारताने त्याचा सच्चा मित्र गमावला. त्या बदल्यात तासाभराचा तरी शोक पंतप्रधान मोदी पाळतील काय? की प्रे. ट्रम्प व नेतान्याहूला काय वाटेल, या भयाने ते मौनातच राहतील!





























































