
दिग्दर्शक नाग अश्विन यांचा ‘कल्की 2898 एडी’ हा सिनेमा गेल्या काही काळातील सर्वात भव्य आणि महागड्या सिनेमांपैकी एक ठरला आहे. या साय-फाय थ्रिलरने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले असून, यात प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांसारख्या दिग्गज सुपरस्टार्सनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, सध्या या सिनेमातील एका अभिनेत्याच्या मानधनाबाबत झालेला खुलासा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सिने निर्माते युगी सेतू यांनी अलिकडेच एका मुलाखतीत हा दावा केला आहे की, दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन हे या सिनेमासाठी सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते ठरले आहेत. इंडियाग्लिट्झला दिलेल्या मुलाखतीत सेतू यांनी सांगितले की, कमल हासन यांना या सिनेमातील त्यांच्या भूमिकेसाठी 150 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या सिनेमासाठी केवळ 20 दिवस चित्रीकरण केले होते. या हिशोबाने कमल हासन यांनी प्रति दिन अंदाजे 7.5 कोटी ते 8 कोटी रुपयांच्या दरम्यान मानधन घेतल्याचे समोर येत आहे.
युगी सेतू यांनी पुढे असेही नमूद केले की, कमल हासन यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील दर्जा आणि वलय इतके मोठे आहे की, त्यांना दररोज जवळपास 10 लाख डॉलर्स (अंदाजे 8 कोटी रुपये) मिळत होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आपण त्यांना ‘हिंदुस्थानातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते’ असल्याचे म्हटले होते, अशी आठवणही सेतू यांनी यावेळी करून दिली. या दाव्यामुळे सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कलाकारांच्या वाढत्या मानधनाची चर्चा सुरू झाली आहे.



























































