दादासाहेब गायकवाड नगरमधील मैदान सर्वांसाठी खुले होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाडच्या दादासाहेब गायकवाड नगरमधील महाराष्ट्र पोलीस हौसिंग फेडरेशनच्या मैदानात स्थानिक नागरिकांसह मुलांना प्रवेश नाकारला जात होता. या मैदानाचे खासगीकरण न करता सर्वांसाठी मैदान खुले करावे, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली होती. शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत परिषदेत तारांकित प्रश्न मांडला. त्यावर हे खेळाचे मैदान सर्वांसाठी खुले असून, या मैदानात खेळण्यापासून कुणालाही मज्जाव घालता येणार नाही. याबाबतच्या सूचना आजच फेडरेशन आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जातील, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प कधीपर्यंत मार्गी लागणार, या प्रकल्पात किती पोलिसांना घरे मिळणार, या भूखंडाच्या बाजूला असलेल्या मैदानात आसपासच्या सर्वसामान्य गरीब मुलांना खेळण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे या मैदानात त्यांना खेळण्यासाठी परवानगी मिळणार का, असा तारांकित प्रश्न शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विचारला होता.

त्यावर मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र पोलीस हौसिंग फेडरेशन ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक संस्था आहे. 14.68 हेक्टर जमीन या संस्थेकडे असून या ठिकाणी खेळाच्या मैदानासाठीदेखील जागा आरक्षित आहे. या जागेवर अवैध काम करणारे, गर्दुल्ले यांचा वावर होता. तो रोखण्यासाठी पत्र्याचे कुंपण घालण्यात आले. या मैदानाचे खासगीकरण झालेले नसून हे मैदान सर्वांसाठी खुले आहे. मुलांना येथे खेळण्यापासून रोखता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

गृहनिर्माण प्रकल्प 2036 पर्यंत पूर्ण होणार

दादासाहेब गायकवाड नगर येथील म्हाडाची मालकी असलेल्या जमिनीचे दोन भाग आहेत. त्यापैकी एक भाग महाराष्ट्र पोलीस फेडरेशनकडे असून उर्वरित भागाचा विकास ‘म्हाडा’मार्फत करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस फेडरेशनला भाडेकराराने देण्यात आलेल्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी फेडरेशनने बांधकाम करारनामा सादर केला आहे. हा प्रकल्प नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार होत असून यातून 1071 घरे उपलब्ध होणार आहेत. मार्च 2036 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.