रॅपर बादशाहने गुपचूप उरकले लग्न; चाहत्यांना सुखद धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहने ईशा रिखी सोबत गुपचुप लग्न उरकले आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. गेल्या काही काळापासून बादशाहच्या लग्नाची चर्चा सुरू होती, पण काहीही निश्चित झाले नव्हते. आता अचानक ईशा रिखीची आई पूनम रिखीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अत्यंत जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत बादशाहाचे लग्न पार पडले.

हे बादशाहचे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने 2012 मध्ये जस्मिन मसीहशी लग्न केले होते. मात्र, 2020 मध्ये या जोडप्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. बादशाहा घटस्फोटानंतर सहा वर्षांनी दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाला आहे. तथापि, बादशाहने आपल्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केलेले नाहीत.

बादशाहने पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल ईशा रिखीला आपली जीवनसाथी म्हणून निवडले आहे. बादशाहाचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला, ज्यामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. ईशा रिखीच्या आईने आणि बहिणीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बादशाह आणि रिखीचे फोटो शेअर करत नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बादशाह आणि ईशा रिखी अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या डेटिंगच्या बातम्या २०२२ मध्ये पसरू लागल्या. असे म्हटले जाते की, ते एका पार्टीमध्ये भेटले होते. मात्र, त्यांनी त्यांच्या नात्याची कधीही अधिकृत घोषणा केली नाही. आता, त्यांच्या लग्नाच्या अचानक आलेल्या फोटोंनी चाहत्यांना धक्का बसला आहे.