मंत्री महाजनांपासून सर्वांचं कमिशन ठरल्याचा दावा! कुंभमेळ्यात हजारो कोटींची टेंडर मॅनेज… लाचखोर विलास लाडच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठीच्या 1 हजार 21 प्रकारच्या कामांची टेंडर्स निघणार आहेत. हजारो कोटी रुपयांची ही सर्व टेंडर्स आधीच मॅनेज करून लोकांना देण्यात येणार आहेत. यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यापासून सर्वांचे कमिशन फिक्स असल्याचा दावा मंत्रालयातील लाचखोर कक्ष अधिकारी विलास लाडने केला आहे. यांसदर्भातील लाड याची एक कथित ऑडिओ क्लिपच व्हायरल झाल्याचे प्रशासकीय तसेच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करण्यासाठी 6 लाख 37 हजारांची लाच घेताना मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागाचा कक्ष अधिकारी विलास लाड याला
अॅण्टी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले होते.

याच लाचखोर विलास लाड याची एक ऑडिओ क्लिप आता पुढे आली आहे. यामध्ये लाड हा 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या विविध कामांच्या टेंडरबाबत धक्कादायक दावे करताना दिसत आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने निघणाऱ्या सर्व कामांची टेंडर्स आधीच मॅनेज झाली असून मंत्र्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांचे कमिशनही आधीच ठरल्याचा दावा करताना दिसत आहे. यामुळे कुंभमेळा नव्हे, हा तर कमिशन मेळा असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.  कथित ऑडिओमधील दाव्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता समोर आलेली नसली, तरी या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पवित्र उत्सवाला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले – विजय वडेट्टीवार

कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला अक्षरशः भ्रष्टाचाराचे कुरण बनवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा एक एक पराक्रम आता उघड होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात कोण कोण मंत्री, अधिकारी सामील आहेत हे समोर आले पाहिजे, अशी मागणी कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय…

नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी काही हजार कोटींचा निधी आला आहे. या कामांचे टेंडर मॅनेज करण्यात आले आहे. या खात्याचे कुंभमेळा मंत्री गिरिष महाजन आहेत. मंत्र्यांपासून ते क्लर्कपर्यंत प्रत्येकाचे कमिशन ठरले आहे, असा दावा विलास लाडने केला आहे.

माझ्या वाटय़ाला 500 कोटींच्या कामाचा कोटा आला आहे. आपण स्वतः 700 तंबू उभारण्याचे तसेच ई-टॉयलेट अन् साफसफाईचे टेंडरही घेतले आहे. नाश्ता आणि जेवणाचे टेंडर 18 कोटींचं असून ते आपल्याला मिळाल्याचा दावा विलास लाड क्लिपमध्ये सांगत आहे.

हा 40 दिवसांचा कुंभमेळा असून त्यामध्ये एवढा खर्च येत नाही, यातून मोठं कमिशन मिळणार आहे. तुझ्या कुणी ओळखीचे लोक असतील तर त्यांना ही टेंडर मॅनेज करून देऊयात. त्यातून आपल्याला लाखो रुपये कमावता येतील, असे लाड समोरच्या व्यक्तीला सांगत आहे.