
आखाती देशातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होताना दिसत आहे. शनिवारी सकाळी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ नोंदवण्यात आली. 24 कॅरेट सोन्याचे दर वधारून 1,52,360 रुपये (प्रति 10 ग्रॅम) झाले आहेत, तर २२ कॅरेट सोन्यासाठी 1,39,660 रुपये मोजावे लागत आहेत. चांदीच्या दरातही 1000 रुपयांची वाढ झाली असून दिल्ली आणि मुंबईत एक किलो चांदीचा भाव 2,60,100 रुपयांवर पोहोचला आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर जवळपास स्थिर असले तरी प्रादेशिक पातळीवर काही प्रमाणात तफावत दिसून येत आहे. मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,52,360 रुपये आहे, तर दिल्लीमध्ये 1,52,510 रुपये इतका आहे. दक्षिण हिंदुस्थानात मात्र सोने खरेदी करणे आजही महाग पडत असून, चेन्नईमध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी सर्वाधिक 1,54,100 रुपये मोजावे लागत आहेत. चांदीने 2,65,100 रुपयांचा उच्चांकी दर गाठल्याचे पाहायला मिळत आहे.
जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतींना काहीसा आधार मिळाला. अमेरिका आणि इराणमधील तात्पुरत्या युद्धविरामानंतर गुंतवणूकदार आता सावध पावले टाकत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून 4,778 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. या आठवड्यात सोन्याच्या किमतीत एकूण 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, प्लॅटिनम आणि पॅलेडियम सारख्या इतर धातूंमध्ये आज घसरण पाहायला मिळाली.


























































