
काळ बदलला, गाणी बदलली, पिढय़ा बदलल्या, पडद्यावरच्या नायिका बदलल्या, परंतु आशा भोसलेंचा आवाज मात्र नेहमीच तरुण आणि ताजाच राहिला. खटय़ाळ, मस्तीखोर, रोमँटिक गाणी गाणाऱया आशाताईंनी प्रदीर्घ आणि खडतर संघर्ष केला आहे. हिंदी पार्श्वगायनाच्या आसमंतात लता मंगेशकर यांच्यासारख्या तेजस्वी सूर्यासमोर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे आशा भोसले यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. परंतु जिद्द आणि अफाट प्रतिभेच्या जोरावर आशा भोसलेंनी त्या सावलीतून बाहेर येत, संगीताच्या क्षितिजावर स्वतःचा स्वतंत्र आणि भक्कम ठसा उमटवला. आशाताईंचा प्रवास सोपा नव्हता.
गाता गाता मरण यावे…
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी एका पॉडकास्टमध्ये आपली अखेरची इच्छा व्यक्त केली होती. आशा भोसले म्हणाल्या की, माझे देवाकडे एकच मागणे आहे, मी गात असतानाच, मला मरण यावं… बास्स… हीच माझी मनापासून इच्छा आहे. आता माझ्यासाठी शिकण्यासारखे काहीच उरलेले नाही. आता आणखी काय शिकायचे बाकी आहे? गाणं हेच माझं आयुष्य आहे. मी अगदी बालपणापासून गात आलेय, विशेषतः वयाच्या तिसऱया वर्षापासूनच मी माझ्या वडिलांकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. माझे संपूर्ण आयुष्य मी याच कलेला समर्पित केले. मी सिनेसृष्टीत 80 ते 82 वर्षं व्यतीत केली आहेत आणि आता माझी अंतिम इच्छा केवळ हीच आहे की, मी गात असताना या जगाचा निरोप घ्यावा.
आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. त्यांच्या संगीताचा प्रवास हा लहानपणापासूनच सुरू झाला होता. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीताचे जाणकार आणि मराठी रंगभूमीवरील मानाचं व्यक्तिमत्त्व होतं. मंगेशकर भावंडांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे छत्र गमावलं. त्यामुळे कुंटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी अगदी लहान वयातच गाण्यास सुरुवात केली. आशा भोसले यांनी त्यांचे पहिलं गाणं ‘माझा बाळ’ (1943) या मराठी चित्रपटात गायलं. त्यांनी ‘चुनरिया (1948)’ या बॉलीवूड चित्रपटात ‘सावन आया’ हे गाणं गायलं. तेव्हापासून त्या संगीताच्या जगात सक्रिय झाल्या.
वयाच्या 16 व्या वर्षी लग्न
वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी कुंटुंबाच्या इच्छेविरुद्ध लता मंगेशकर यांचे सचिव गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. गणपतराव हे आशाताईंपेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. या निर्णयामुळे लतादीदी इतक्या दुःखी झाल्या की त्यांनी आपल्या बहिणीशी असलेले सर्व संबंध तोडले. लग्नानंतर आशा भोसले यांना अनेक कौटुंबिक अडचणींना तोंड द्यावे लागले. लग्नाच्या 11 वर्षांनी म्हणजेच 1960 साली आशा भोसले आणि गणपतराव वेगळे झाले. गणपतरावांपासून त्यांना दोन मुले आणि एक मुलगी झाली.
पंचमदा यांच्याशी दुसरा विवाह
आशा भोसले यांनी 1980 मध्ये संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले. दोघांची पहिली भेट 1966मध्ये ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटातील एका गाण्यादरम्यान झाली. त्यानंतर आशा भोसले यांनी आर.डी. बर्मन यांच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. बर्मन यांच्या आईने लग्नाला स्पष्ट नकार दिला. बर्मन यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली. अशा परिस्थितीत आईची प्रकृती सुधारण्यासाठी बर्मन यांनी आशा भोसले यांच्याशी लग्न केले.
एक सुरेल नातं…
एस.डी. बर्मन यांच्यासोबत काम करत असताना आशा भोसले यांची ओळख त्यांचा मुलगा आर.डी. बर्मन (पंचम) यांच्याशी झाली. 1966 साली नासिर हुसेन यांच्या ‘तीसरी मंझिल’ या चित्रपटातून आशा भोसले आणि आर.डी. बर्मन यांनी काम करायला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या सुरेल नात्याचा पाया रचला गेला, ज्याने पुढे हिंदी चित्रपटसंगीताचं स्वरूपच बदलून टाकलं. आर.डी. बर्मन जेव्हा चित्रपटसृष्टीत आले, तेव्हा त्यांच्या मनात जगभरातील संगीत होतं. त्यांना हिंदी सिनेमात फंक, जॅझ, पॅबरे आणि रॉक-एन-रोलसारखे नवे प्रयोग करायचे होते. पण अशा अवघड आणि वेगळ्या सुरांसाठी त्यांना एक लवचिक, धाडसी आणि प्रयोगशील आवाज हवा होता. तो आवाज आशा भोसले यांचा होता. एकीकडे ‘पिया तू अब तो आजा’ (कारवाँ) आणि ‘दम मारो दम’ (हरे रामा हरे पृष्णा) या गाण्यांनी आशा भोसले यांना आधुनिक, वेस्टर्न स्टाइलची गायिका म्हणून ओळख मिळवून दिली. तर दुसरीकडे आर.डी. बर्मन यांच्यासोबत ‘इजाजत’ (1987) या चित्रपटातील ‘मेरा पुछ सामान’ आणि ‘खाली हाथ शाम आई है’ यांसारख्या गाण्यांमधून त्यांनी शांत भाव व्यक्त केला.
ओ.पी. नय्यर–एस.डी यांची साथ
सुरुवातीला आशा भोसले यांच्या कारकिर्दीला बिमल रॉय यांच्या ‘परिणीता’ (1953) आणि राज कपूर यांच्या ‘बूट पॉलिश’ (1954) या चित्रपटांतील गाण्यांमुळे बळकटी मिळाली. परंतु, संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्याशी झालेली भेट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टार्ंनग पॉइंट ठरला. सुरुवातीला ओ.पी. नय्यर यांची पहिली पसंती गीता दत्त असायच्या. पण ‘सीआयडी’ चित्रपटानंतर त्यांच्या संगीतामध्ये आशा भोसले यांनी आपलं स्थान निर्माण केलं. 1957 च्या ‘नया दौर’ चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मोठा इतिहास रचला. त्याच वर्षी म्हणजे 1957 मध्ये संगीतकार एस.डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे आशा भोसले यांच्यासाठी यशाची नवीन दारे उघडली गेली. पुढील पाच वर्षे एस.डी. बर्मन यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत काम केलं नाही. या काळात त्यांच्या पंपूमधील मुख्य गायिका म्हणून आशा भोसले उदयास आल्या. संगीतकार एस.डी. बर्मन, किशोर पुमार, आशा भोसले आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी या चौघांनी मिळून रोमँटिक आणि खटय़ाळ गाण्यांचं एक नवं युग सुरू केलं. ‘हाल पैसा है जनाब का’ (चलती का नाम गाडी), ‘आँखों में क्या जी’, ‘छोड दो आँचल’ (पेइंग गेस्ट) आणि ‘दीवाना मस्ताना हुआ दिल’ (बंबई का बाबू) अशी अनेक सुंदर गाणी आजही लोकांच्या लक्षात आहेत.
पुरस्कार
आशा भोसले यांना 2000 साली दादासाहेब फाळके तर 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. लोकप्रिय बंगाली गाण्यांसाठी पश्चिम बंगाल सरकारने 2018 साली त्यांना बंग विभूषण तर 2020 मध्ये महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात आला. याशिवाय दोन वेळा राष्ट्रीय पुस्कार आणि तब्बल 7 वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.
टॉप टेन मराठी गाणी
- चांदणे शिंपित जाशी
- धुंदी कळ्यांना
- सांज ये गोपुळी
- मधु इथे अन् चंद्र तिथे
- येरे घना…येरे घना
- मागे उभा मंगेश
- गोमू संगतीनं
- रेशमाच्या रेघांनी
- जांभूळ पिकल्या झाडाखाली
- रुपेरी वाळूत माडांच्या बनात
टॉप टेन हिंदी गाणी
- चुरा लिया है तुमने जो दिल को
- दम मारो दम
- पिया तू अब तो आजा
- इन आँखों की मस्ती के
- ओ मेरे सोना रे सोना रे
- दिल च़ीज क्या है
- आओ हुजूर तुमको
- रंगीला रे…
- आइए मेहरबां
- सजना है मुझे सजना के लिए
दिल पडोसी है…
ऐंशीच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या ‘दिल पडोसी है’ या खाजगी अल्बमची निर्मिती सुप्रसिद्ध संगीतकार आर.डी. बर्मन यांनी केली होती. या अल्बमचे गीतलेखन गुलजार यांनी केले असून सर्व गाणी आशा भोसले यांनी गायली आहेत. हा अल्बम 8 सप्टेंबर 1987 रोजी आशा भोसले यांच्या वाढदिवशी प्रदर्शित झाला होता. 14 गाण्यांचा समावेश असलेल्या या अल्बममध्ये गुलजार यांच्या काळजाला भिडणाऱया कवितांचाही समावेश होता.
व्हर्सटाईल गायिका अन् उत्तम पूक
वैविध्यपूर्ण गाणी गाणाऱया आशा भोसले यांच्या हातालाही तितकीच सुरेख चव होती. खाण्यावर, खाऊ घालण्यावर त्यांचे प्रचंड प्रेम, याच प्रेमातून त्यांनी जगभरात रेस्टॉरंटची चेन उघडली. दुबई आणि पुवेतमध्ये ‘आशाज’ नावाचे त्यांचे रेस्टॉरंट आहे. यात हिंदुस्थानी खाद्यपदार्थ मिळतात. आशा भोसले यांनी स्वतः या रेस्टॉरंटमधील शेफना प्रशिक्षण दिले होते.
संगीतकार रवी–आशा जोडीने उडवली धम्माल
आशाताई या संगीतकार रवी यांच्या आवडत्या पार्श्वगायिका. ‘वचन’ या चित्रपटासाठी रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चंदा मामा दूर के’ या अंगाई गीताला आशा भोसले यांनी आवाज दिला. त्यानंतर रवी यांनी घराना, ग्रहस्थी, काजल आणि फूल और पत्थर या चित्रपटांतील भजने आशाताईंकडून गाऊन घेतली. यापैकी ‘तोरा मन दर्पण कहलाए’ हे भजन अजरामर ठरले. रवी यांनी आशा भोसले यांच्याकडून वेगवेगळ्या ढंगातील गाणी गाऊन घेतली. ‘दिल्ली का ठग’साठी गायलेले सीएटी कॅट, कॅट माने बिल्ली… हे धम्माल गाणेही होते. याशिवाय वक्त, चौदवी का चाँद, गुमराह, बहुबेटी अशा अनेक चित्रपटांत आशाताईंनी गाणी गायली.
गुलाम अली यांच्यासोबत मेराज-ए-गझल
1980च्या दशकात आशा भोसले यांनी गझलसम्राट गुलाम अली यांच्यासोबत मेराज-ए-गझल या अल्बमसाठी गाणी गायली. दोन्ही महान कलाकारांच्या कारकिर्दीतला हा अविस्मरणीय अल्बम ठरला. हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी शास्त्रीय संगीताचा दुर्मिळ मिलाफ असलेल्या या अल्बममध्ये 12 गझल असून यात ‘दिल धडकने का सबब याद आया’ आणि ‘फिर सावन रुत की पवन चली’ यांसारख्या लोकप्रिय गझलांचा समावेश आहे.
‘उमराव जान’ची जादू
‘उमराव जान’ साठी खय्याम यांनी धाडसी निर्णय घेत आशा भोसले यांची निवड केली. पण त्यासाठी खय्याम यांच्या म्हणण्यानुसार आपली नेहमीची खटयाळ आणि नखरेल शैली बाजूला ठेवून, खालच्या सूरात गाण्याचा प्रयोग केला. ‘उमराव जान’ चे रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर आशा भोसले यांनी आवाज ऐकला, तेव्हा त्या स्वतःच थक्क झाल्या. ‘दिल चीज क्या है’, ‘इन आँखों की मस्ती के’ आणि ‘ये क्या जगह है दोस्तों’ यांसारख्या कालातीत गझलांनी त्यांच्या आवाजाचा एक मखमली, शांत आणि भावपूर्ण पैलू जगासमोर आणला, जो पूर्वी फारसा पुणाला माहीतच नव्हता.
बाबूजींसोबत अजरामर गीते
प्रख्यात गायक, संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्यासोबत आशाताईंनी केलेले काम कालपटलावर अजरामर ठरले आहे. सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या अनेक गाण्यांना आशाताईंनी स्वर दिला. त्याचबरोबर सुधीर फडके यांच्यासोबत अनेक गाणीही गायली. ही सर्वच गाणी अजरामर ठरली. ‘जगाच्या पाठीवर’, ‘या सुखांनो या’, ‘धाकटी बहीण’, ‘लाखाची गोष्ट’, ‘सुवासिनी’, ‘लक्ष्मीची पाऊले’ अशा अनेक चित्रपटांतील गाण्यांना या जोडीने आवाज दिला. यातील बहुतेक गाणी बाबूंजींनी संगीतबद्ध केली होती. तुला पाहते रे… बाई मी विकत घेतला श्याम… का रे दुरावा का रे अबोला… जीवलगा कधी रे येशील तू… प्रेम वेडी राधा… अशी असंख्य गाणी आजही संगीतरसिकांच्या तोंडावर आहेत. आशा भोसले यांनी बाबूजींना आपले गुरूच मानले होते. त्यांच्यासोबत काम करताना अनेक गोष्टी मला शिकता आल्या, असे त्या आवर्जून सांगत.
घरात गायलेले भजन होतेय व्हायरल
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर… हे भजन नुकतेच आशा भोसले यांनी घरातल्या डायनिंग टेबलवर बसून गायले होते. काही दिवसांपूर्वीची ही एक संस्मरणीय भेट, असे म्हणत या गाण्याचा व्हिडिओ सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी शेअर केला आहे.
वानखेडेवर आशाताईंना श्रद्धांजली
आशा भोसले यांना आज वानखेडे स्टेडियमवर श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांमध्ये वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघांनी व प्रेक्षकांनी मौन पाळून आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. या वेळी वातावरण भावूक झाले होते. आशाताईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून खेळण्यासाठी मैदानात उतरले होते.
























































