
लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील 131वा घटनादुरुस्ती विधेयक सादर करताना सरकार आणि विरोधकांमध्ये गुरुवारी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी या विधेयकाचे समर्थन करत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे सांगितले. प्रस्तावित बदलांनुसार लोकसभेची संख्या 815 पर्यंत वाढवण्यात येणार असून त्यापैकी 272 जागा महिलांसाठी राखीव असतील. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिलांसाठीही आरक्षणाची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षण लागू झाल्यानंतर पुरुष किंवा कोणत्याही राज्याचे नुकसान होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
मात्र या विधेयकावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी चर्चेची सुरुवात करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी हे विधेयक “महिला-विरोधी, जातीय जनगणना-विरोधी, घटनाविरोधी आणि संघराज्य व्यवस्थेविरोधी” असल्याचा आरोप केला. महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मात्र ते सध्याच्या 543 जागांच्या आधारे तात्काळ लागू करावे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
गौरव गोगोई म्हणाले, “महिला आरक्षण लागू करण्यासाठी तुम्ही मतदारसंघ पुनर्रचना जबरदस्तीने का लादत आहात? विधेयकात तुम्ही 850 सदस्यांची संख्या आणली आहे — ही संख्या कुठून आली? ती कोणी ठरवली? सरकारने? कोणताही सरकारी कागद आहे का? संसदीय समितीचा अहवाल आहे का? की ही संख्या अचानक कुठून तरी आली?”
गोगोई यांनी पुढे आरोप केला की, हे विधेयक प्रत्यक्षात महिला आरक्षणासाठी नसून मागच्या दाराने मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा घाट आहे. सरकार मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, जम्मू-काश्मीर आणि आसाममध्ये जे झाले, तेच आता संपूर्ण देशात महिला आरक्षणाच्या नावाखाली करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. भाजप प्रतीकात्मक राजकारण करत असून महिला आरक्षणाच्या मुद्द्याचा वापर करून मतदारसंघ पुनर्रचनेचा मार्ग मोकळा करण्याचा डाव आखत असल्याची टीकाही त्यांनी केली.
लोकसभेत या विधेयकावर सुमारे 40 मिनिटे तीव्र चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये 251 सदस्यांनी विधेयकाच्या समर्थनात मतदान केले, तर 185 सदस्यांनी विरोध केला. या विधेयकासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयकही सादर करण्यात आले.



























































