
>> सोहम पिंगळीकर
[email protected]
नव्वदच्या दशकात स्वतची एक खास प्रतिमा घडवणारा मायकल जॅक्सन, ज्याचा चाहता वर्ग आजही जगभर विस्तारलेला आहे. अँटोनी फुक्वा दिग्दर्शित ‘मायकल’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चरित्रपट मायकलच्या या जादूचा पुनप्रत्यय देतोय, 90 च्या पिढीसाठी नॉस्टॅल्जिक राईड ठरतोय.
काही लोक पॉप्युलर असतात, काही स्टार असतात आणि मग क्वचित एखादा असा येतो, ज्याच्यापुढे हे दोन्ही शब्द लहान वाटतात. मायकल जॅक्सन हा असाच एक अवलिया. एका कार्यक्रमात शाहरुखने स्टेजवर गेल्यावर काही क्षणांपूर्वी इथे मायकल उभा होता म्हणून पोडियमवर आपले ओठ टेकवले होते. मायकलच्या मोहिनीचा इथेच अंदाज येतो.
अँटोनी फुक्वा दिग्दर्शित ‘मायकल’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमामुळे लोकांना ही मायकलची जादू पुन्हा अनुभवता येत आहे. सिनेमा मायकलच्या लहानपणापासून सुरुवात करून त्याच्या जागतिक स्टार होण्यापर्यंतचा प्रवास दाखवतो. स्वतची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी केलेला संघर्ष, त्याचे भावविश्व आणि त्याची आयकॉनिक गाणी यांच्यामधून सिनेमा त्याच्या आयुष्यातल्या ठरावीक टप्प्यांवरच लक्ष केंद्रित करतो. जाफर जॅक्सन या मायकलच्या पुतण्याने आपल्या काकाची भूमिका साकारली आहे. जाफरचा लुक, त्याची देहबोली आणि ऊर्जा पाहिल्यावर पडद्यावर खरंच मायकल उभा आहे असा आभास तयार होतो. समीक्षकांनी चित्रपटावर मिश्र प्रतिक्रिया दिल्या तरी प्रेक्षक मात्र थिएटरमधून बाहेर पडताना “Billie Jean’’ गुणगुणतच बाहेर येतात.
पण गाणारी पाच भावंडं असताना एकटा मायकलच कसा काय मोठा झाला? याचं उत्तर मायकलच्या गाण्याइतकेच त्याच्या नृत्यात आणि ठरवून घडवलेल्या प्रतिमेत दडले आहे. एमटीव्हीने गाण्यांचे व्हिडीओ दाखवून टीव्हीवर एक नवी क्रांती केली होती. मायकल त्यावरचा पहिला कृष्णवर्णी कलाकार होता. मायकलची गाणी फक्त ऐकायची नव्हती तर पाहायची होती. त्यांना कथानक होतं, विशिष्ट वेशभूषा होती आणि जोडीला मायकलची विलक्षण नृत्यशैली होती. मायकलच्या गाण्यात शब्दांना महत्त्व नव्हतं, तर लय आणि चाल महत्त्वाची होती आणि सगळं गाणं लक्षात राहिलं नाही तरी “Annie, are you okay?’’ अशी एखादी ओळ मात्र दिवसभर ओठावर रेंगाळायची.
मायकलने स्वतची एक खास प्रतिमा घडवली होती. पांढरा ग्लव्ह, चमकदार बूट आणि कुरळे केस, त्यात मूनवॉक आणि अँटी-ग्रॅव्हिटी लीन अशा त्याच्या खास स्टेप्समधून त्याने स्वतची ‘किंग ऑफ पॉप’ म्हणून प्रतिमा तयार केली. कोणीही येता-जाता “ही ही’’ किंवा “आऊ’’ ओरडले तरी समोरचा व्यक्ती ओळखायचा की हा मायकल जॅक्सनच. जगभरात हजारो लोकांनी त्याच्या नकला केल्या, त्याच्यासारखे कपडे केले आणि यामुळे आजही तो त्याच्या फॅन्समध्ये जिवंत राहिला आहे. सिनेमा नेमकं हेच करतो, तो फॅन्सच्या आठवणीतला मायकल पुन्हा पडद्यावर उभा करतो. विशेषत ‘थ्रिलर’ या त्याच्या अल्बमची निर्मिती प्रक्रिया रंजकपणे दाखवली आहे. एकामागोमाग एक गाणी, ओळखीची दृश्यं, स्टेज परफॉर्मन्स पाहताना जणू ग्रेटेस्ट हिट्सची प्लेलिस्ट चालू आहे असं वाटतं आणि खरं सांगायचं तर मायकलची अपरिचित बाजू, वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यापेक्षा प्रेक्षकांनासुद्धा पॉपस्टारच हवा असतो. फॅन्सची ही मागणी हा कॉन्सर्टसदृश्य सिनेमा तंतोतंत पुरी करतो.
मायकलच्या आयुष्याची दुसरी बाजूही त्याची प्रतिमा घडवण्यात (आणि बुडवण्यात) तितकीच महत्त्वाची ठरली. त्वचेतील बदल, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांवरील अत्याचारांचे आरोप आणि अखेरीस ड्रग्ज ओव्हरडोसने झालेला मृत्यू अशा सगळ्या गोष्टी त्याच्या सार्वजनिक प्रतिमेचा भाग होत्या. त्यातील काही गोष्टी सिद्ध, काही वादग्रस्त, पण त्या पूर्णपणे वेगळ्या काढणं अशक्यच. या पार्श्वभूमीवर, जॅक्सन कुटुंबीयांच्या थेट नियंत्रणाखाली असलेला हा सिनेमा या मुद्दय़ांवर शांत राहतो. गाणे, बातम्या, आरोप, अफवा अशा अनेक माध्यमांमधून प्रेक्षकांसमोर मायकलचं एक खास पण विस्कळित व्यक्तिमत्त्व तयार झालं आहे. एकाच वेळी ‘ग्रेटेस्ट’ आणि वादग्रस्तही असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याच्याबद्दल गूढ आकर्षण आहे, पण सिनेमा मात्र त्याची बहुरंगी प्रतिमा बाजूला टाकून सुसंगत, सोपी कथा तयार करतो. मायकलचा तरलपणा, त्याची भावनिकता, त्याची असुरक्षितता हीच एक बाजू प्रेक्षकांसमोर येते. पण त्याचं एकूण व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी सिनेमा तोकडा पडतो, असं म्हणावं लागेल.
90 च्या पिढीसाठी हा सिनेमा म्हणजे एक नॉस्टॅल्जिक राईड आहे. या काळात सॅटेलाइट टीव्ही आल्यामुळे मायकलची गाणी जगभरात गाजत होती. त्याचे चढ-उतार, आजारपण, पेनकिलरचं व्यसन, खटले हे सगळं काही या पिढीने पाहिलेलं आहे. त्यांच्यासाठी हा सिनेमा म्हणजे त्रासदायक घटना विसरून मायकलच्या चांगल्या आठवणींमध्ये रमायची संधी आहे. नव्या पिढीसाठी हा अनुभव वेगळा आहे. कदाचित ही त्यांची मायकलशी पहिलीच ओळख असेल. त्यांनी गाणी ऐकली असली तरी त्यांना आरोप, खटले माहिती असतील अशी खात्री नाही. त्यांच्यासाठी सिनेमात दिसणारा तेवढाच ‘खरा’ मायकल आहे. थोडक्यात ही पिढी या सिनेमाकडे दस्तावेज म्हणून बघणार आहे आणि इथेच गुंता वाढतो.
कारण एकीकडे 90 च्या दशकातला जिवंत मायकल आहे, गाण्यांइतकाच बातम्या आणि अफवांमध्ये गुरफटलेला. दुसरीकडे सिनेमात दिसणारा आयकॉन आहे, ज्याचं आयुष्य गाणं, नृत्य आणि पाळीव प्राणी यांच्याभोवतीच फिरते. हे दोन्ही मायकल एकसारखे नक्कीच नाहीत, पण सिनेमातला मायकल जास्त टिकाऊ होण्याची शक्यता आहे. कारण त्याची ही प्रतिमा गुंतागुंतीची नाही. ती सोपी आहे, सुंदर आहे आणि पुनः पुन्हा पाहायला सोयीची आहे.
सिनेमा पाहिल्यावर नाचत बाहेर पडलो तरी काही प्रश्न मात्र मनात राहतात. मायकलची प्रतिमा एका चौकटीत बांधणं अशक्य आहे. मग हा सिनेमा खरोखर मायकल जॅक्सनला आठवतोय… की नव्या पिढीसाठी त्याची सोयीस्कर, नवी प्रतिमा घडवतोय?
(लेखक चित्रपट समीक्षक, अभ्यासक आहेत)






























































