
हिंदू-मुसलमान, लव्ह-जिहाद, धर्मांतर, ईदच्या कुर्बान्या अशा विषयांवर नवहिंदूंचे स्थानिक मठाधीश आवाज उठवतात व आंदोलन करतात. त्यांच्यादृष्टीने हिंदू अशा वेळी खतऱ्यात येतो, पण विषारी दारू विकणारे व त्यात मरणारे लोकही हिंदूच असूनही अशा वेळी ही मंडळी गप्प बसतात. पुन्हा बिगरहिंदूंच्या जागांवर बुलडोझर चालवणारे सरकार विषारी दारूच्या अड्ड्यांवर बुलडोझर चालवत नाही. कारण ते सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाखाली लोकांना विष पाजत असतात. पुण्यातील पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी रात्री दहानंतर ‘बंद’चा आदेश काढला, पण इथे रात्री नव्हे, तर दिवसाढवळ्या विषारी दारूकांडात 16 जणांची हत्या झाली. आता दिवसाही पुणे बंद करणार काय?
महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेचे धिंडवडे काढणारी आणखी एक दुर्घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात विषारी दारूने आतापर्यंत 16 लोकांचा बळी घेतला. ही बातमी सुन्न करणारी आहे. ही केवळ एक घटना-दुर्घटना नाही, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जी राज्यव्यवस्था निर्माण केली आहे, त्या व्यवस्थेचे हे अपयश आहे. पंतप्रधान मोदी कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाला मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशात उष्मा वाढला आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या, पण पुण्यातील मजूर वर्गाने मोदींचा संदेश वेगळ्या अर्थाने घेतला. त्यांनी विषारी दारू पिऊन स्वतःचे जीवन संपवले. 16 मृतांची कुटुंबे उघड्यावर पडली. आता या 16 कुटुंबांनाही सरकार आर्थिक सहाय्य करणार काय? हे बळी सरकारच्या भ्रष्ट व्यवस्थेचे आहेत. त्यामुळे हत्येचे पातक सरकारच्या डोक्यावर आहे. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाशिवाय विषारी दारू विकली जाणे अशक्य आहे. गृहमंत्री असलेले फडणवीस यांचा कारभार दिवसेंदिवस बकवास होत आहे. ते निवडणुकांच्या गुंत्यात व स्वतःची राजकीय गणिते जुळवण्यात व्यस्त आहेत. गृहखात्याचा जास्तीत जास्त वापर हा सध्या आपल्या राजकीय विरोधकांचा छळ करण्यासाठी, खोट्या प्रकरणांत गुंतवून ‘ब्लॅकमेल’ करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा जमिनीवरील संपर्क तुटला आहे. गुन्हेगारांवर वरवंटा फिरवण्याची वल्गना मुख्यमंत्री करतात. प्रत्यक्षात काल 16 कुटुंबांवर
विषारी दारूकांडाने
वरवंटा फिरवला. गृहमंत्री म्हणून या हत्याकांडाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनीच घेतली पाहिजे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर कष्टकरी, मजूर वर्ग आहे. ते स्वस्तातली देशी दारू पितात. अशा दारूत मिथेनॉलसारखे केमिकल्स मिसळले जाते व त्यामुळे दारूचे विष बनते. त्यातून गरीबांचे हे मृत्यू होतात. महाराष्ट्रात फडणवीसांचे व देशात मोदींचे सरकार हे गरीबांचा विचार करताना दिसत नाही. त्यांच्या घोषणा मोठ्या असतात, पण कृती शून्य आहे. श्रीमंतांना उंची दारू मिळते व त्यांच्या मद्यपानास प्रतिष्ठा आणि संरक्षण आहे, पण गरीबांचा श्रमपरिहार अशा विषारी दारूत कायमचा संपतो. पुण्यातील विषारी दारूकांडाचा हाच संदेश आहे. विषारी दारूकांडाचे बळी फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण भारतात होत आहेत. बिहार, पंजाब, तामीळनाडू, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत दारूकांडाचे बळी गेले आहेत. विषारी दारूच्या भ्रष्ट रॅकेटला राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय ही दारू विक्री शक्य नाही. पुण्यातील ज्या विभागात हे दारूकांड घडले, त्या विभागाच्या सर्वच स्तरावरच्या लोकप्रतिनिधींसाठी हा प्रकार लांच्छनास्पद आहे. ठेकेदारी व कमिशनबाजीतून थोडा वेळ काढून या लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील विषारी दारू, जुगार, मटक्याचे अड्डे बंद करण्यासाठी शर्थ केली तर असे नाहक बळी जाणार नाहीत व गरीबांची कुटुंबे उघड्यावर पडणार नाहीत. पुण्यासारख्या शहरात आज गुन्हेगारी क्षेत्रातील
प्रत्येक ‘अॅक्शन’
घडते. येथे दरोडे पडतात, लहान मुलींवर बलात्कार होऊन त्यांचे खून पाडले जातात. भररस्त्यावर कोयते, तलवारी, बंदुका चालवून रस्ते रक्ताने भिजवले जातात. त्यात आज विषारी दारूने केलेल्या हत्याकांडाची भर पडली. म्हणजे गृहमंत्र्यांच्या डोक्यावर ‘दारूकांडाचा तुराही’ खोचला गेला. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात ‘हातभट्टी’ दारू खुलेआम विकली जाते. मुळात पुणे, मावळ भाग हा देशी दारूचे मोठे कोठार बनले आहे. अशा वेळी पोलीस व स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात? आता म्हणे, पोलिसांनी त्या दारू विक्रेत्यासह काही लोकांना अटक केली व ज्या दारूगुत्यावर लोक ही दारू प्यायले त्या गुत्यावर कारवाई केली. 16 जणांचे मृत्यू झाल्यावर पोलिसांना ही जाग आली. एरव्ही हिंदू-मुसलमान, लव्ह-जिहाद, धर्मांतर, ईदच्या कुर्बान्या अशा विषयांवर नवहिंदूंचे स्थानिक मठाधीश आवाज उठवतात व आंदोलन करतात. त्यांच्यादृष्टीने हिंदू अशा वेळी खतऱ्यात येतो, पण विषारी दारू विकणारे व त्यात मरणारे लोकही हिंदूच असूनही अशा वेळी ही मंडळी गप्प बसतात. पुन्हा बिगरहिंदूंच्या जागांवर बुलडोझर चालवणारे सरकार विषारी दारूच्या अड्ड्यांवर बुलडोझर चालवत नाही. कारण ते सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाखाली लोकांना विष पाजत असतात. पुण्यातील पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी रात्री दहानंतर ‘बंद’चा आदेश काढला, पण इथे रात्री नव्हे, तर दिवसाढवळ्या विषारी दारूकांडात 16 जणांची हत्या झाली. आता दिवसाही पुणे बंद करणार काय?






























































