सामना अग्रलेख – संतापाची सुंता, बंगालात राष्ट्रपती राजवट लावा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
AI Colorize Image

. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांवर हल्ले झाले. त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. यावर . बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी राज्यपाल रवी यांनी तोंड उघडलेले नाही. म्हणजे तेथील सरकारचे गुंडांना संपूर्ण अभय आहे आणि विरोधी लोकप्रतिनिधींना त्यांना ठार मारायचे आहे. . बंगालात नवहिंदुत्वानेही उसळी मारली आहे. हा म्हणे जनतेचा संताप आहे. मग नीट पेपर फुटले, इंधन महागले, सरकार रोज खोटे बोलत आहे, महागाईने कहर केला आहे असे असताना जनता संतापण्याऐवजी भाजपची इतकी प्रेमदिवानी का झाली आहे? इथे संतापाची सुंताका झाली आहे, याचाही खुलासा व्हावा!

.बंगाल हे सांस्कृतिकदृष्टय़ा खूप श्रीमंत आणि बौद्धिकदृष्टय़ा प्रगल्भ राज्य आहे. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत प. बंगाल व महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दाखवली. बंगाली रेनेसां (Bengal Renaissance), रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, सत्यजित राय, झोनाकी, शिल्प, रवींद्र संगीत, साहित्य यामुळे भारतातील सर्वात सुसंस्कृत राज्यांपैकी एक मानले जाते. कोलकाता हे बराच काळ भारताची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच इंग्रजांनी सर्वप्रथम इथेच आपला डेरा टाकला. तेच प. बंगाल आज हिंसाचार, द्वेष, झुंडशाहीचे प्रतीक बनले आहे. दोन दिवसांत कोलकात्यात ज्या घटना घडल्या त्यामुळे प. बंगालच नव्हे, तर देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस विद्यमान खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला भ्याड तितकाच निर्घृण आहे. अभिषेक बॅनर्जी हे हल्ल्यातून नशिबाने बचावले. लगेच दुसऱ्या दिवशी तृणमूलचेच ज्येष्ठ खासदार कल्याण
बॅनर्जी यांच्यावरही खुनी हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. बॅनर्जी हे सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील आहेत. ते ज्येष्ठ नागरिक आहेत, पण त्यांनाही भाजपच्या हल्लेखोरांनी सोडले नाही. विधानसभा निवडणुकीत प. बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळाली. मात्र या सत्तेचा वापर ते लोककल्याणाऐवजी राजकीय सुडाची खाज शमविण्यासाठी करत आहेत. अभिषेक बॅनर्जी हे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. ते ममतांना पुत्रवत आहेत. मुळात प. बंगालचे सत्तापरिवर्तन हे लोकशाहीची नीतिमूल्ये पाळून सरळ मार्गाने झालेले नाही. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व गैरप्रकारांचा अवलंब केला. गृहमंत्री अमित शहा हे कोलकात्यात ठाण मांडून बसले होते.

तीन लाखांवर

शस्त्र अर्धसैनिक बल त्यांनी प. बंगालात उतरवले. त्याआधी साधारण 90 लाख लोकांची नावे मतदार यादीतून वगळून ममता यांच्या समर्थनाचा तराजू हलका केला. निवडणूक आयोगास या काळात घरगड्याची भूमिका वठविण्याचे आदेश होते. अशा प्रकारे पैशांचा, दहशतीचा अतिरेक झाला तेव्हा कोठे भाजप सत्तेवर आला. किमान 80 विधानसभा मतदारसंघांत त्यांनी निकालांच्या बाबतीत हेराफेरी केली ती वेगळीच. भाजपचा प. बंगाल, आसामातील विजय हा खरा नाही हे सगळय़ांनीच मान्य केले आहे आणि आता सत्तेत आल्यावर भाजपने प. बंगालमध्ये नवी झुंडगिरी सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे प्रकार मान्य आहेत का? जर मान्य असतील तर त्यांनी कोलकात्यात येऊन तसे जाहीर करावे व अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ले करणाऱ्यांचा सत्कार करून भाजप संस्कृतीचा उदो उदो करावा. जर श्री. मोदी यांना ही झुंडशाही खरोखरच मान्य नसेल तर त्यांनी निवडणूक काळात पाठवलेली तीन लाखांची फौज प. बंगालात पुन्हा पाठवावी व कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे. ममता यांच्या काळात खासदारांवर असे हल्ले झाले असते तर राज्यपालांनी प. बंगालात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्राला केली असती. बंगालचे आजचे चित्र भयंकर आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या डोक्यात दगड मारले गेले, त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने ते वाचले. खासदार कल्याण बॅनर्जी यांचेही तसेच झाले. हल्ला पूर्वनियोजित होता आणि मला मारण्याचा डाव होता, असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले, पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी नेहमीप्रमाणे काखा वर केल्या. या सगळय़ांशी भाजपचा संबंध नाही. हा जनतेचा संताप आहे. भट्टाचार्य म्हणतात, हा जनतेचा संताप आहे. म्हणून

खासदारांना ठार मारण्याचा

रवाना भाजपने कोलकात्यातील गुंडांना दिला आहे काय? ममता बॅनर्जी या पंधरा वर्षे मुख्यमंत्री होत्या. बंगालच्या जनतेने त्यांच्यावर अलोट प्रेम केले. ‘रस्त्यावर लढणारी वाघीण’ असे ममता यांना म्हटले जाते. आता त्यांचा पराभव झाला म्हणून भाजपपेमी जनता संतापली व ममता यांच्या खासदारांना मारले यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. ही ठरवून सुरू असलेली गुंडगिरी आहे. एकतर भाजपला ममता यांचा पक्ष फोडायचा आहे व बंगालवर गुंडांचे राज्य कायमस्वरूपी आणायचे आहे. ममता यांच्या काळात बांगलादेशी घुसखोरांनी प. बंगालची संस्कृती नासवली व गुंडगिरी केली असे भाजपचे म्हणणे आहे. मग आता भाजप राज्यात भयंकर गुंडगिरीची सुरुवात झाली ते कोण आहेत? बांगलादेशी घुसखोरांची जागा टिळेधारी गुंडांनी घेतली. यालाच कुणी सत्तापरिवर्तन झाले असे म्हणत असतील तर ते भारतीय घटनेशी बेइमानी करत आहेत. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांवर हल्ले झाले. त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. यावर प. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी व राज्यपाल रवी यांनी तोंड उघडलेले नाही. म्हणजे हे खुनी हल्ले भाजपपुरस्कृत आणि कायद्याच्या चौकटीत झाले! तेथील सरकारचे गुंडांना संपूर्ण अभय आहे आणि विरोधी लोकप्रतिनिधींना त्यांना ठार मारायचे आहे. प. बंगालात नवहिंदुत्वानेही उसळी मारली आहे. हा म्हणे जनतेचा संताप आहे. मग नीट पेपर फुटले, इंधन महागले, सरकार रोज खोटे बोलत आहे, महागाईने कहर केला आहे असे असताना जनता संतापण्याऐवजी भाजपची इतकी प्रेमदिवानी का झाली आहे? इथे संतापाची ‘सुंता’ का झाली आहे, याचाही खुलासा व्हावा!