निस्तेज त्वचेला द्या नैसर्गिक उजाळा; केळीचे 3 फेसपॅक ठरतील फायदेशीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या चेहऱ्याची काळजी ही सौंदर्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला चेहरा हा जपावा लागतो. उन्हाळ्यात धूळ, प्रदूषण आणि कडक उन्हाचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कमी होऊन त्वचा निस्तेज, कोरडी आणि काळवंडलेली दिसू लागते. अनेकजण यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधने किंवा विविध स्किन ट्रीटमेंट्सचा आधार घेतात. मात्र, घरच्या घरी उपलब्ध असलेले काही नैसर्गिक उपायही त्वचेला तितकाच फायदा देऊ शकतात.

केळे हे आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे, तितकेच ते त्वचेसाठीही उपयुक्त मानले जाते. केळ्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक त्वचेचे पोषण करून तिला मऊ, तजेलदार आणि निरोगी बनवण्यास मदत करतात. केळ्यामध्ये काही साधे घटक मिसळून तयार केलेले फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतात.

केळी आणि मधाचा फेसपॅक

त्वचेला नैसर्गिक चमक आणि ओलावा मिळवून द्यायचा असेल तर केळी आणि मधाचा फेसपॅक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी अर्धे पिकलेले केळे कुस्करून त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून सुमारे 20 मिनिटे ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. केळे त्वचेला पोषण देते, तर मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो.

केळी आणि दह्याचा फेसपॅक

उन्हामुळे त्वचा टॅन झाली असेल किंवा चेहऱ्याचा रंग निस्तेज वाटत असेल, तर केळी आणि दह्याचा फेसपॅक फायदेशीर ठरू शकतो. एक पिकलेले केळे कुस्करून त्यात दही मिसळावे आणि तयार मिश्रण चेहऱ्यावर लावावे. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. दह्यातील लॅक्टिक अॅसिड मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते, त्यामुळे त्वचा अधिक उजळ आणि तजेलदार दिसते.

केळी आणि बेसनचा फेसपॅक

त्वचेवरील काळपटपणा कमी करण्यासाठी केळी आणि बेसन यांचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. अर्ध्या कुस्करलेल्या केळ्यात एक चमचा बेसन मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा, मान तसेच हात-पायांवर लावता येते. पॅक सुकल्यानंतर हलक्या हाताने चोळून काढावा. यामुळे मृत त्वचा दूर होते आणि त्वचा अधिक स्वच्छ, मुलायम व चमकदार दिसू लागते. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले हे फेसपॅक त्वचेची काळजी घेण्यासाठी सोपे आणि किफायतशीर उपाय ठरू शकतात. मात्र, संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी करून पाहणे आवश्यक आहे.