प्रदिप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेत चोरट्यांची दिवाळी, तब्बल 117 तोळे सोने लंपास; कडक पोलीस बंदोबस्त असतानाही चोरीच्या घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवचनकार प्रदीप मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत दुधनाळ येथे सुरू असलेल्या शिवपुराण कथेमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कथा ऐकण्यासाठी आलेल्या महिला भाविकांच्या अंगावरील तब्बल 117 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. या धाडसी चोर्‍यांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, चोरांचा सुगावा न लागल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर भाविकांमधून तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या दुधनाळ येथे गेल्या सहा दिवसांपासून या भव्य शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी लातूर, धाराशिव, सोलापूर उमरगा निलंगा औसा औराद किल्लारी तसेच कर्नाटकातील बिदर, भालकी, गुलबर्गा, हुलसुर, बसवकल्याण या भागांतून दररोज लाखो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. यामध्ये महिला भाविकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भाविकांच्या अथांग सुमुद्रासाठी या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मात्र, याच अलोट गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांना आपले लक्ष्य केले.

कथा ऐकण्यात मग्न असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी अत्यंत शिताफीने लंपास केले. विशेष म्हणजे, दररोज कथा सुरू होण्यापूर्वी आणि दरम्यान, ‘महिलांनी आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी व चोरट्यांपासून सावध राहावे’, अशा सूचना ध्वनिक्षेपकावरून (स्पीकर) सातत्याने दिल्या जात होत्या. तसेच कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही, पोलिसांना आणि भाविकांना चकवा देत चोरट्यांनी आपली हातसफाई दाखवली आणि तब्बल 117 तोळे सोने पळवून नेले. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत असतानाही अद्याप एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दररोज चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने, ‘मोठा बंदोबस्त असतानाही पोलीस चोरांना पकडण्यात अपयशी का ठरत आहेत ? असा सवाल उपस्थीत करण्यात येत आहे.

अंगावरील सोने चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी महिलांनी पोलिसांकडे दिलेल्या आहेत. परंतु याबाबत पोलिसांनी अद्याप एकाही चोराला पकडले नाही किंवा त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा असुनही त्याचा उपयोग पोलीस करत नाहीत. दुधनाळ येथील पोलीस कोणतीही कठोर भूमिका घेत नसल्याने चोरांचा सुळसुळाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकांनी तर तक्रारी पण दिलेल्या नाहीत. पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.