मुद्दा – शिक्षण व्यवस्थेचे आत्मपरीक्षण कधी होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. भालचंद्र पाटील

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांनी देशभरातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हादरले आहेत. हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. तो भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या नैतिक आणि बौद्धिक अधःपतनाचा गंभीर इशारा आहे. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नाही. ते व्यक्तिमत्त्व घडवण्याचे, संस्कार रुजवण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे माध्यम आहे. गुरू-शिष्य परंपरेतून ज्ञानासोबतच प्रामाणिकपणा, संयम, कर्तव्य भावना आणि राष्ट्रनिष्ठा रुजवली जात होती. मात्र गेल्या काही दशकांत शिक्षण क्षेत्रात स्पर्धा, बाजारपेठ आणि व्यापारीकरणाचा अतिरेक वाढला आहे. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, शिक्षणाचा आत्माच धोक्यात आल्याची भीती वाटू लागली आहे. आमच्या यशवंत क्लासेस या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षांपासून नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना घडवताना त्यांच्या डोळ्यांतील डॉक्टर, अभियंता आणि अधिकारी होण्याची स्वप्ने जवळून आजही पाहत आहे. एखाद्या विद्यार्थ्याचे यश हे केवळ त्याचे एकटय़ाचे नसते. त्यामागे पालकांचा त्याग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संपूर्ण कुटुंबाची आशा दडलेली असते.

लाखो विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अनेक पालक कर्ज काढतात, दागिने गहाण ठेवतात आणि मुलांच्या भविष्यासाठी संघर्ष करतात. अशा वेळी पेपरफुटी होते तेव्हा फक्त प्रश्नपत्रिका फुटत नाही; लाखो कुटुंबांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास तुटतो. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण केवळ औपचारिकता बनले आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती फक्त कागदोपत्री असते आणि संपूर्ण शिक्षण कोचिंगकेंद्रित झाले आहे.

प्रात्यक्षिकांशिवाय गुण

प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रयोग न करता विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जात आहेत. विज्ञान शिक्षणाचा पाया असलेली प्रयोगशीलताच हरवत चालली आहे. मायक्रोस्कोपला हात न लावलेला विद्यार्थी उत्कृष्ट डॉक्टर कसा होणार? हा प्रश्न निर्माण होतो.

शॉर्टकट संस्कृतीचा विस्तार

सखोल ज्ञानापेक्षा ‘परीक्षा कशी व्रॅक करावी’ यावर भर दिला जात आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि बौद्धिक प्रामाणिकपणा कमी होत आहे.

सततचे कोचिंग, सराव परीक्षा, सोशल मीडियावरील रँकिंग आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षा यामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली जगत आहेत. अनेकांना परीक्षेतील अपयश म्हणजे आयुष्य संपल्यासारखे वाटू लागले आहे.

शिक्षणाचे व्यापारीकरण

आज अनेक शैक्षणिक संस्था उद्योगासारख्या चालवल्या जात आहेत. विद्यार्थी ‘ग्राहक’ आणि निकाल हे ‘उत्पादन’ बनत चालले आहे. शिक्षण हा व्यापार नाही. तो सुसंस्कृत समाज घडवण्याचा पाया आहे.

तंत्रज्ञानामुळे ज्ञान सहज उपलब्ध झाले असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षकांशी असलेले भावनिक नाते, वर्गातील संवाद आणि सामाजिक संस्कार कमी होत आहेत. स्क्रीन माहिती देऊ शकते; पण चारित्र्य घडवण्याचे सामर्थ्य जिवंत शिक्षकाकडेच असते.

उपाय काय?

परिस्थितीवर केवळ टीका करून उपयोग नाही. परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक सुरक्षा, मल्टि-सेट प्रश्नपत्रिका, बायोमेट्रिक उपस्थिती, प्रात्यक्षिक परीक्षांवर कठोर देखरेख आणि विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व्यवस्था आवश्यक आहे. शिक्षण संस्थांचे व्यापारीकरण रोखण्यासाठी कठोर नियमनही गरजेचे आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात समग्र शिक्षणावर भर दिला गेला आहे. मात्र कोणतेही धोरण ते राबवणाऱ्या माणसांच्या प्रामाणिकतेशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. आपल्याला अशी शिक्षण संस्कृती उभी करावी लागेल, जिथे गुणांपेक्षा गुणवत्ता मोठी असेल, रँकपेक्षा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असेल आणि स्पर्धेपेक्षा संस्कारांना स्थान असेल. आज प्रत्येक शिक्षक, पालक आणि समाज घटकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे – आपण विद्यार्थ्यांना फक्त यश शिकवत आहोत की योग्य मार्गाने जगण्याची ताकदही देत आहोत?