शेतीवर महागाईचा नांगर फिरला,  पेट्रोल-डिझेल भाववाढीमुळे जेसीबीचे भाडे महागले; बळीराजा हतबल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असतानाच आता शेतीवरही महागाईचा नांगर फिरला आहे. पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे जेसीबीचे भाडे महागले असून अवजारे, बी-बियाणे, कीटकनाशकांच्या दरवाढीमुळे तर जीव मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे बळीराजाचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. पावसाळ्यापूर्वीच्या कामांची लगबग सुरू असताना ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलेन, ट्रेलर आणि डंपर या वाहनांच्या भाड्यामध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाईच्या या ओझ्यामुळे शेती करायची तरी कशी या प्रश्नाने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भातशेती होते. ही शेती पावसावर अवलंबून असून बळीराजा या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. अनेक संकटांशी सामना करून शेतकरी शेती करत असून महागाईमुळे काळ्या आईची सेवा करणेही कठीण होऊन बसले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, याचा सामना करत शेतकरी आपल्या शेतात काबाडकष्ट करून हिरवे सोने पिकवत आहे. शहापूर, जव्हार, वाडा, मोखाडा या भागात तर शेतकरी शंभर टक्के भात पिकांवर अवलंबून असतात. पावसाळ्यापूर्वीची कामे आता सुरू झाली असली तरी त्यासाठी लागणारी साधने जमा करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

■ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत असल्याने यंत्रांच्या भाड्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

■ बी-बियाणे खते आणि मजुरीचा खर्चदेखील वाढला असून यावर्षी शेती करायची तरी कशी, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे सुधागड तालुका कृषी मित्र संघटनेचे सचिव शरद गोळे यांनी सांगितले.

■ खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्यावरील अनुदान सरकारने कमी केले आहे. त्यामुळे खते व औषधांच्या किमती दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढल्या आहेत.

फळे, फुले लागवडीकडे ओढा

यांत्रिकी पद्धतीने शेती करणे दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. मजुरी आणि यंत्रांचे भाडे परवडत नसल्याने खर्डी व परिसरातील शेतकरी भात शेतीऐवजी आता फळे व फुले लागवडीकडे वळल्याचे दिसून येत आहे. कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने या लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.

उत्पादन खर्च दुप्पट

जमिनीची नांगरणी, चिखलणी आणि सपाटीकरण करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा जेसीबीचा वापर केला जातो. पण आता शेतकऱ्यांना त्याचा खर्च परवडत नाही. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने शेतीच्या उत्पादनाचा खर्च दुप्पट झाला असून नाईलाजाने कर्ज काढण्याची वेळ आली आहे. तर इंधन दरवाढीमुळे यंत्रांच्या भाड्यातदेखील वाढ करावी लागली अशी माहिती पालीमधील व्यावसायिक नीलेश पवार यांनी दिली.