टाकाऊ वस्तूंपासून इंधनमुक्त ‘सोलर वॉर’..! कोल्हारच्या ‘रेंचो’कडून अवघ्या 11 हजारांत निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय शिवलेकर

इराण-अमेरिका संघर्षामुळे जगभरात इंधन व ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना राहाता तालुक्यातील कोल्हार येथील रँचोने आपल्या कल्पकतेच्या जोरावर पेट्रोल-डिझेलला पर्याय ठरू शकेल, असा अभिनव प्रयोग साकारला आहे. पवन राजेंद्र खर्डे या युवकाने टाकाऊ व भंगार साहित्याचा वापर करून सौरऊर्जेवर चालणारी तीनचाकी तयार केली असून, सोलर वॉर असे नामकरण केलेल्या या वाहनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आखाती युद्धामुळे ऊर्जा संकट आणि वाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले हे वाहन पर्यावरणपूरक तर आहेच, शिवाय अत्यंत कमी खर्चात तयार झाल्याने ग्रामीण भागासाठी आशेचा किरण ठरत आहे. अवघ्या ११ हजार रुपयांच्या खर्चातून आणि केवळ दहा दिवसांच्या अथक परिश्रमातून हे वाहन तयार करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या वाहनामध्ये वापरण्यात आलेले सोलर पॅनल, बॅटरी, चाके, स्टिअरिंग आणि इतर बहुतांश साहित्य भंगार दुकानातून खरेदी करण्यात आले आहे. वाहनाचा समतोल राखण्यासाठी स्वतंत्र स्टिअरिंग प्रणाली तर मागील दोन चाकांना गती देण्यासाठी अभिनव यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

सौरऊर्जेच्या साहाय्याने चालणारे हे वाहन दिवसाला सुमारे १०० किलोमीटर अंतर पार करू शकते. वाहनाची वहन क्षमता तब्बल २०० किलो असून, मागील बाजूस ट्रॉली जोडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. दिवसाच्या वेळी सूर्यप्रकाशातून ऊर्जा मिळत असताना रात्रीच्या प्रवासासाठी बॅटरीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे वाहन दिवसरात्र वापरणे शक्य होते.

दर तासाला १५ ते २० किलोमीटर वेगाने धावणारे हे वाहन ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

पवन खर्डे हा युवक विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी परिसरात परिचित आहे. लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.ई. (मेकॅनिकल) शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या तो अहिल्यानगर येथील विखे पाटील फाउंडेशनच्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राशी संलग्न आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि ग्रामीण गरजांचा संगम घडवून आणण्याची त्याची धडपड सातत्याने सुरू असते.

वाहनाचे नाव : सोलर वॉर
निर्माते : पवन राजेंद्र खर्डे, कोल्हार
खर्च : ११,००० रुपये
निर्मितीस लागलेला कालावधी : १० दिवस
वहन क्षमता : २०० किलो
प्रवास क्षमता : १०० कि.मी. प्रतिदिन
वेग : १५ ते २० कि.मी. प्रतितास
ऊर्जा स्त्रोत : सौरऊर्जा व बॅटरी
वैशिष्ट्य : टाकाऊ साहित्यापासून तयार केलेले पर्यावरणपूरक वाहन