भाजपच्या काळात 44 वेळा पेपर फुटले, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – अरविंद सावंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) ऑन-स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीतील कथित अनियमितता आणि परीक्षा व्यवस्थापनातील त्रुटींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सीबीएसई अध्यक्षांची बदली करून काहीही साध्य होणार नाही, तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंगळवारी केंद्र सरकारने सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली केली. तसेच मंडळाच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीसाठी सेवा खरेदी प्रक्रियेशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले की, “तुम्हाला एक परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही. त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 44 प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. सीबीएसईमध्येही गोंधळ झाला. त्यावर तुम्ही काय केले? फक्त बदली. बदल्या करून काय उपयोग? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधान अजूनही पदावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःच्या मंत्र्याला पदावरून हटवण्याचे अधिकार नाहीत का?” असेही अरविंद सावंत म्हणाले

नीट-यूजी 2026 प्रश्नपत्रिका गळती प्रकरणावरूनही सावंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) एकही परीक्षा सुरळीतपणे घेऊ शकत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

देशभरात विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील कथित प्रश्नपत्रिका गळतीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या ओएसएम प्रणालीबाबतही वाद निर्माण झाला असून, या प्रकरणात केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे.