बेस्ट समितीच्या बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करा ! सेवानिवृत्त कामगारांच्या युनियनची प्रशासनाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन तसेच मुंबई महापालिका सभागृहातील बैठकांच्या थेट प्रक्षेपणाप्रमाणे बेस्ट समितीच्या बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने केली आहे. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन किंवा मुंबई महापालिकेतील सभागृहाच्या बैठकीत काय चर्चा सुरू आहे, कोणते निर्णय घेतले जात आहेत याची माहिती व्हावी यासाठी तेथील बैठकांचे थेट प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे कारभारात पारदर्शकता येत असून नागरिकांना त्या माहितीच्या आधारे आपल्या सूचना, हरकती मांडता येत आहेत. त्याच धर्तीवर बेस्ट समितीची बैठक सुरू असताना तिचे थेट प्रक्षेपण यूट्यूब आणि बेस्टच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेलवर करावे, अशी सूचना बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने केली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवासी आणि बेस्टच्या कर्मचारी वर्गाला सूचना आणि उपाययोजना बेस्ट समितीसमोर मांडता येतील, असे निवेदनात म्हटले असून बेस्ट समितीच्या पुढील बैठकीपासूनच थेट प्रक्षेपण सुरू करण्याची विनंती केली आहे.