
>> तृप्ती कुलकर्णी
[email protected]
गझलेचे तंत्र अत्यंत मूलभूत पातळीपासून शिकवणारा, या साहित्य प्रकाराबाबत मार्गदर्शन करणारा ‘गझल प्राविण्य’ हा आश्वासक व्हॉटसअप समूह.
प्रत्येक कवी-कवयित्रीला इतकंच नव्हे तर रसिकालाही साद घालणारा गझल हा साहित्यप्रकार… ऐकायला, दाद द्यायला जितका उत्स्फूर्त आणि सहज वाटतो तितकाच तो रचण्यासाठी कठीण, संयमाची आणि तंत्रशुद्धतेची मागणी करणारा असतो. शब्दांची नजाकत, भावनांची नेमकी अभिव्यक्ती आणि वृत्त, मात्रा, काफिया, रदीफ यांसारख्या नियमांची अचूक सांगड घालत गझल घडवावी लागते. तर अशाच एका गझलसाधनेसाठी स्वतला वाहून घेतलेल्या ‘गझल प्राविण्य परिवार’ अर्थात प्रवीण पुजारी यांच्या या प्रवासाची ही गोष्ट.
प्रवीण पुजारी यांना लहानपणापासूनच आई-वडिलांकडून साहित्यिक संस्कारांचा वारसा लाभला. कविता, साहित्य आणि भाषेची आवड त्यांच्या मनात रुजली आणि त्यातूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कवितालेखन करत असतानाच गझल या साहित्यप्रकाराने त्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र गझल शिकण्याचा प्रवास तितका सोपा नव्हता. गझलेचं तंत्र समजून घेण्यासाठी अनेक अडचणी, संभ्रम आणि अनुभवातून त्यांना जावं लागलं. या संपूर्ण प्रवासात त्यांना प्रकर्षाने जाणवलं की गझल शिकवण्यासाठी एक शास्त्रशुद्ध, संयमी आणि सातत्यपूर्ण पद्धतीची गरज आहे.
याच जाणिवेतून 15 मे 2020 रोजी ‘गझल प्राविण्य परिवार’ या उपक्रमाची स्थापना झाली. गझल शिकू इच्छिणाऱया प्रत्येकासाठी (मग ते अगदी युवक असो वा ज्येष्ठ) सहज उपलब्ध आणि योग्य मार्गदर्शन देणारा हा व्हॉटसअप समूहाद्वारे चालवला जाणारा परिवार आज अनेक गझलप्रेमींसाठी आधारवड ठरला आहे. आजवर या समूहातर्फे सातत्याने ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून शेकडो जणांनी त्याचा लाभ घेतला आहे. आणि अजूनही घेत आहेत.
या कार्यशाळेचं वैशिष्टय़ म्हणजे गझलेचं तंत्र अत्यंत मूलभूत पातळीपासून शिकवलं जातं. ‘गझलमध्ये काय लिहावं’ हे जरी व्यक्तिपरत्वे बदलत असलं तरी ‘कसं लिहावं’ यासाठी आवश्यक असलेलं तंत्र मात्र अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे वृत्त, मात्रा, लगावली, काफिया, रदीफ, शेररचना अशा प्रत्येक घटकाचं सविस्तर मार्गदर्शन कार्यशाळेत केलं जातं. अगदी अ आ इ पासून सुरू होणारा हा अभ्यासक्रम जवळपास पन्नास पाठांचा असून प्रत्येक टप्प्यानंतर सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शन दिलं जातं.
आजच्या झटपट कार्यशाळांच्या काळात ‘गझल प्राविण्य परिवार’ची कार्यशाळा मात्र दोन ते अडीच महिने चालते. कारण गझलेचं तंत्र हे केवळ काही दिवसांत सांगता येत असलं, तरी आत्मसात करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव आणि योग्य दिशा आवश्यक असते. म्हणूनच या कार्यशाळेत प्रत्येकाला गझल तंत्र समजेपर्यंत संयमाने शिकवलं जातं. विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम पूर्णत विनामूल्य आहे.
आईवडिलांकडून मिळालेला समाजाप्रती असलेल्या दायित्वाबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्याची वृत्ती आणि साहित्यिक संस्कारांचा वारसा जपत प्रवीण पुजारी यांनी हा उपक्रम सुरू केला आणि गेल्या सहा वर्षांपासून तो त्याच निष्ठेने सुरू आहे.
कार्यशाळेनंतरही गझलप्रेमींचा प्रवास थांबत नाही. व्हॉटसअप समूहातर्फे विविध स्पर्धा, एक शेर गझल उपक्रम, रदीफ-काफिया सराव, आशयाधारित उपक्रम अशा माध्यमांतून गझलकारांना सातत्याने प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिलं जातं. या प्रक्रियेतून अनेक नवोदित गझलकार घडले असून त्यांना गझलेच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
‘गझल प्राविण्य परिवार’ची आणखी एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे तंत्र आणि भाषेबाबत कोणतीही तडजोड न करणे. मराठी भाषेच्या समृद्ध शब्दसंपदेचा वापर करत आशयसंपन्न, तंत्रशुद्ध आणि दर्जेदार गझल निर्माण व्हावी हा या परिवाराचा मुख्य हेतू आहे.
वैयक्तिक अनुभवातून आणि साहित्यिक संस्कारांतून सुरू झालेली ही गझल चळवळ आज अनेक गझलप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. विशेष म्हणजे, प्रवीण पुजारी यांचं गझल समृद्ध करण्याचं आणि तिचा निस्वार्थ प्रचार-प्रसार करण्याचं स्वप्न आता केवळ त्यांचं राहिलेलं नाही; तर ते संपूर्ण ‘गझल प्राविण्य परिवार‘चं सामूहिक स्वप्न बनलं आहे. आणि हीच गोष्ट मराठी गझलविश्वासाठी निश्चितच आश्वासक आहे.
गझल शिकण्यास उत्सुक असाल तर तुम्ही प्रणव बनसोडे यांच्याशी 9674189303 या मोबाईल नंबरवर थेट संपर्क करू शकता.


























































