हिंदुस्थानची ‘धावा’भरणी; सुदैवी राहुल आणि कर्णधार गिल यांची शतके, 3 बाद 368 अशी दमदार मजल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीचा पहिला दिवस हिंदुस्थानच्या फलंदाजांनी गाजवला. सुदैवी ठरलेल्या के. एल. राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावत संघाची पहिल्या दिवशी भक्कम धावाभरणी केली. त्यामुळे हिंदुस्थानला पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 अशी मजल मारता आली आहे.

राहुल कसा ठरला सुदैवी

झियाउर रेहमानच्या गोलंदाजीवर 11 व्या षटकात राहुलने ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. तो यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. त्यानंतर गोलंदाज व यष्टिरक्षक दोघांनीही जोरदार अपील केले. पंचांनी नाबाद दिले. त्यानंतर ‘रिप्ले’मध्ये दिसले की चेंडू राहुलच्या बॅटची कडा  घेऊन गेला होता. त्यानंतर राहुलने नशिबाची साथ मिळाल्याने सावरत खेळ केला आणि 11 चौकारांच्या जोरावर 100 धावांची खेळी साकारली.

राहुलसुदर्शनची जोडी जमली

नशीब बलवत्तर असलेल्या राहुलने यशस्वी बाद झाल्यावर साई सुदर्शनबरोबर डावाला चांगला आकार दिला. साईने आक्रमक फलंदाजी करत 13 चौकारांच्या मदतीने 81 धावा करत संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱया विकेटसाठी 131 धावांची दमदार भागीदारी रचली.

गिलपंतची फटकेबाजी

गिलला दिवसाच्या उत्तरार्धात ऋषभ पंतची सुयोग्य साथ मिळाली.  गिलने 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 103 धावांची दमदार खेळी साकारली. पंतने दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. दिवसअखेर भारताने 368 धावांपर्यंत मजल मारली असून रविवारी 600 धावांचा डोंगर उभारण्याचा त्यांचा मानस असेल.

संक्षिप्त धावफलक

हिंदुस्थान – 85 षटकांत 3 बाद 368 (शुभमन गिल नाबाद 103, के. एल. राहुल 100, साई सुदर्शन 81, ऋषभ पंत नाबाद 50; मोहम्मद सलीम 2/67) वि. अफगाणिस्तान.