
>> माधव डोळे
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली ठाणेकरांची मेट्रो केंद्र सरकारनेच लटकवल्याचे समोर आले आहे. या मेट्रोला क्लियरन्स प्रमाणपत्र देण्यास रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आरडीएसओने (रिसर्च डिझाईन्स अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन) तब्बल सात महिने लावले आहेत. हे प्रमाणपत्र उशिरा मिळाले असून सीएमआरएस (कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी) या नियामक प्राधिकरणाचे प्रमाणपत्र मिळणे अद्यापि बाकी आहे. या संपूर्ण प्रक्रियेला उशीर होणार असल्याने आता एमएमआरडीएने मेट्रो सुरू करण्यासाठी नोव्हेंबर २०२६ ही नवी डेडलाइन दिली आहे. त्यामुळे ठाणेकरांचे मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न साकार होण्यास जवळपास सहा महिने लागणार आहेत.
मेट्रो ४ हा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ही मेट्रो वडाळा ते कासारवडवली यादरम्यान धावणार आहे. ३२ किमीचा हा मार्ग असून गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे काम सुरू आहे. कोरोनाचा काळ व त्यानंतर आलेले अनेक अडथळे यामुळे ठाण्याच्या मेट्रोचे काम मंद गतीने सुरू आहे. गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत कासारवडवली ते कॅडबरी जंक्शनदरम्यान ट्रायल रन घेण्यात आली. त्यामुळे लवकरच ठाण्यात मेट्रो धावेल असे नागरिकांना वाटले होते. पण अजूनपर्यंत ही मेट्रो कागदावरच आहे.
- ठाण्याच्या मेट्रोला सुरक्षाविषयक प्रमाणपत्र मिळण्यासाठी एमएमआयडीएने ‘आरडीएसओ’कडे सात महिन्यांपूर्वी अर्ज केला होता, पण २०९ दिवसांनंतर हे प्रमाणपत्र मिळाले आहे.
- आरडीएसओचे मुख्यालय लखनऊ येथे असून रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट या क्षेत्रात काम करते. मेट्रोसाठी आवश्यक असलेली तांत्रिक बाजू पडताळून प्रमाणपत्र दिले जाते.
- ठाणे शहरात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तातडीने एमएमआरडीएला प्रमाणपत्र देणे गरजेचे होते, पण तेथे काम करणाऱ्या बाबूंनी वेळकाढूपणा केला आहे.
आता प्रतीक्षा सीएमआरएसच्या हिरव्या कंदिलाची
आरडीएसओने ठाणे मेट्रोला प्रमाणपत्र दिल्यानंतर आता पुढील आठवड्यात सीएमआरएसकडून (कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सिटी) हिरवा कंदिल मिळण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे. सीएमआरएस हे रेल्वे सुरक्षा आयोगाच्या अंतर्गत कार्यरत असलेले नियामक प्राधिकरण आहे. ठाणे मेट्रो सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षाविषयक मानदंडाची पूर्तता केली आहे की नाही याची तपासणी प्राधिकरण करणार आहे. त्यानंतर सुरक्षाविषयीचे अंतिम प्रमाणपत्र दिले जाईल. ते मिळाल्यानंतर यावर्षीच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत गायमुख ते कॅडबरी जंक्शनदरम्यान मेट्रो सुरू होईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

























































