
वाडा कोलम या भाताच्या वाणासाठी प्रसिद्ध असलेल्या वाडा तालुक्यात यंदा कर्जत-३ आणि रत्नागिरी-८ या भाताच्या वाणांची लागवड होणार आहे. पंचायत समितीने या दोन्ही वाणांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले. मात्र – ते पुरेसे नसल्यामुळे पाहिल्याच दिवशी स्टॉक संपला. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बियाणे वितरण केंद्रासमोर लांबच – लांब रांगा लागल्या. भर उन्हात रांगेत उभे राहूनही बियाणे न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
वाडा तालुक्यात सुमारे २३ – हजार शेतकऱ्यांकडून दरवर्षी सुमारे १४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी पंचायत समितीमार्फत शासनमान्य भात बियाणांचे वितरण करण्यात आले. या वर्षी पंचायत समितीकडे कर्जत-३ या जातीचे १९२ क्विंटल भात बियाणे उपलब्ध होते, तर रत्नागिरी-८ या जातीचे केवळ २ क्विंटल ३० किलो बियाणे उपलब्ध झाले होते. अशा प्रकारे एकूण १९४.३० क्विंटल भात बियाण्यांचा साठा प्राप्त झाला होता. फक्त ८०० शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बियाणे वितरण केंद्रावर मोठी झुंबड उडाली होती. मात्र तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांची संख्या आणि लागवडीखालील क्षेत्र लक्षात घेता हा साठा अत्यंत अपुरा ठरला. त्यामुळे अनेक शेतकरी बियाणे मिळण्याच्या आशेने तासन्तास उन्हात उभे राहिले, परंतु बियाण्यांचा साठा संपल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
जिल्हा प्रशासनाने कमी बियाणे दिले
वाडा तालुक्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा स्तरावर उपलब्ध साठ्याच्या दुप्पट भात बियाण्यांची मागणी पंचायत समितीने केली होती. मात्र जिल्हा प्रशासनाकडून फक्त १९४.३० क्विंटल एवढाच साठा प्राप्त झाला. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या या साठ्याचे नियोजन करून पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील गवारी यांनी व्यक्त केली आहे.


























































