
‘आताचा काळ टेक्नॉलॉजीचा आहे. सगळे काही टेक्नॉलॉजीने व्यापले आहे. एआय अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सही कळत नकळत आपल्या आयुष्यात आले आहे. मात्र, या सगळ्या गोष्टींना घाबरून घरी बसण्याऐवजी हे तंत्रज्ञाना शिकून घ्या. त्याचा वापर करून आपल्या आयुष्यात आणि समाजात बदल घडवा,’ असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केले.
शिव संचार सेनेच्या वतीने शिवसेना भवन येथे आयोजित सायबर सुरक्षा मार्गदर्शन शिबिरात आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नवे तंत्रज्ञान, सायबर सेफ्टी आणि सायबर सिक्युरिटीचे महत्त्व अधोरेखित केले. ‘तंत्रज्ञानाला घाबरून चालणार नाही. त्याचा वापर करता आला पाहिजे. व्हॉट्सऍपवर ‘गुड’ हा शब्द टाइप केल्यानंतर मॉर्निंग, आफ्टरनून का येते हे समजून घेतले पाहिजे. एआयचे हे बेसिक स्वरूप आहे. ‘एआय’ आल्यामुळे अनेकांना नोकऱ्या जाण्याची भीती वाटते. मात्र ही भीती बाळगण्याची गरज नाही. कारण आता एआयकेंद्रित नोकऱ्या तयार होणार आहेत. त्या मिळवायच्या असतील तर एआय काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे,’ असे ते म्हणाले.
‘चॅटजीपीटी, क्लाउड अशा बऱ्याच गोष्टी आता आलेल्या आहेत. त्याही शिकायला हव्यात. तुम्ही एखाद्या ठिकाणी नगरसेवक, आमदार असाल किंवा भविष्यात इच्छुक असाल तर तिथले प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही एआय वापरू शकता. एखाद्या विधेयकावर सभागृहात बोलायचे असेल, विषय मांडायचा असेल तर चॅटजीपीटीला योग्य आज्ञा दिली तर सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सायबर तज्ञ राजेंद्र तावाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी तावाटे यांचे स्वागत केले. शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांच्या पुढाकाराने हे शिबीर झाले. या शिबिरास शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे उपस्थित होते.
अधिवेशन, मंत्री आणि एआय
तंत्रज्ञान समजून घेणे का गरजेचे आहे हे सांगताना आदित्य ठाकरे यांनी यावेळी अधिवेशनातील किस्सा सांगितला. ‘अधिवेशनात आम्ही अनेकदा प्रश्न विचारले की काही मंत्री आम्ही एआय वापरतो असे उत्तर देतात. अनेकदा त्यांना एआयचा फुलफॉर्मही माहीत नसतो. मागच्या अधिवेशनात गंमत म्हणून मी काही प्रश्न विचारले. त्यावर मंत्र्यांचे उत्तर त्यांनी ‘आम्ही एआय वापरतो’ असे होते. खरेतर त्या विषयाचा आणि एआयचा काडीचा संबंध नव्हता. त्यामुळे मागचे मंत्री हसत होते, पण उत्तर देणाऱ्या मंत्र्यांना काही कळले नाही,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आज शिवसेना भवन येथे शिव संचार सेनेच्या वतीने आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी उपस्थिती लावली व उपस्थितांशी संवाद साधला.
ह्यावेळी शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे आणि शिव… pic.twitter.com/ZvCevTQNSr— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 7, 2026





























































