
छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष लवकरच इस्रायलच्या भूमीमध्ये दुमदुमणार आहे. इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत यानिव रेवाच यांनी केली. राज्य शासनाने त्याला पूर्ण पाठिंबा दिला. शिवरायांचा भव्य पुतळा हिंदुस्थानात बनवून तो इस्रायलच्या एका प्रमुख शहरात प्रस्थापित केला जाणार आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची महती हिंदुस्थानातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. शिवरायांच्या पराक्रमाने इस्रायलही प्रभावित आहे. इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेवाच आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. यावेळी रेवाच यांनी इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी राज्य शासनाने सहकार्य आणि परवानगी द्यावी असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी इस्रायलच्या या उपक्रमाचे तक्षणी स्वागत करतानाच त्यासाठी लागणारे संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे इस्रायल आणि हिंदुस्थान मैत्रीचा नवा सुवर्ण अध्याय लिहिला जाईल, अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थानात आल्यानंतर आपण दोन्ही देशांचा इतिहास आणि संस्कृती याचा बारकाईने अभ्यास केला. हिंदुस्थान आणि इस्रायल या दोन्ही देशांचा इतिहास संघर्षाचा राहिला आहे. मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भूमीसाठी आणि स्वराज्यासाठी मोठा संघर्ष केला, तसाच ज्यू बांधवांनाही आपल्या मातृभूमीसाठी अनेक दशके लढा द्यावा लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, रणनीती आणि त्यांचे विचार संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत. शिवरायांसारख्या महान विभूतींची माहिती इस्रायलमधील जनतेला व्हावी आणि उभय देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक घट्ट व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे रेवाच म्हणाले.
Proud to announce that we will install a statue of Chatrapati Shivaji Maharaj in Israel. To make this project befitting to the grand character of Maharaj, Consul General @yanivrev met Hon’ble CM of Maharashtra Shri @Dev_Fadnavis and requested help of experts.
Hon’ble CM… pic.twitter.com/zWLfXxjFj5— 🇮🇱 Israel in Mumbai (@israelinMumbai) June 6, 2026




























































