
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लंपडावामुळे संताप झालेल्या कामोठेकरांनी शनिवारी मध्यरात्री रस्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस आणि प्रशासनाची एकच पळापळ उडाली. शुक्रवारीही कामोठेमधील रहिवाशांनी आंदोलन छेडले होते. शनिवारी रहिवासी रस्त्यावर उतरल्यांनतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा सुरळीत केला.
कामोठे शहरातील विविध भागांमध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. बुधवारी एका भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी तब्बल 27 तास लागले होते. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा वीजपुरवठ्याचा लंपडाव सुरू झाला. शनिवारी सायंकाळी सहा वाजता गेलेली वीज रात्री उशिरापर्यंत आली नाही. त्यामुळे मध्यरात्री घराबाहेर पडून नागरिकांनी लहान मुलांसह रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले.
पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नागरिकांनी आंदोलन केले. मध्यरात्रीच्या सुमारास हजारो नागरिकांचा मोर्चा रस्त्यावर उतरल्यामुळे त्यांना शांत करताना पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी खारघर परिसरात तांत्रिक बिघाड दूर करण्याच्या कामात गुंतले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्री कामोठेतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन थांबवून घरी परतण्यास सुरुवात केली.
वाढत्या वीज मागणीमुळे तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी काम सुरू होते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांनी दिली.
कामोठेतील वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर काही मिनिटांसाठी कळंबोली परिसरातही वीज खंडित झाली होती. मात्र तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर तेथील वीजपुरवठाही सुरळीत करण्यात आला.
पाणीटंचाईपाठोपाठ विजेचे विघ्न
नागमोडे आणि कळंबोली परिसरात रहिवाशांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यापाठोपाठ आता विजेचे विघ्न सुरू झाले आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे रहिवासी घामांच्या धारांत नाहून निघत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून महावितरणकडून असलेल्या या छळवणुकीमुळे शेवटी कामोठेतील रहिवाशांच्या संयमाचा बांध शनिवारी मध्यरात्री फुटला. हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलीस ठाण्याच्या चौकात रस्ता रोको आंदोलन छेडले.




























































