
अजित पवार गटाच्या मंत्री आणि श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांच्या विधानसभा मतदार संघात विकास हरवला असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वृद्धापकाळाने निधन झालेल्या जगनाथ भगत यांच्या पार्थिवावर श्रीवर्धनमधील स्मशानभूमीत शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र येथील स्मशानभूमीत लाईटची बोंबाबोंब असल्याने नागरिकांना चक्क मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार आटोपण्याची वेळ आली.
पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या श्रीवर्धन शहरात अनेक कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. मात्र शहरातील स्मशानभूमीत साधी विजेची व्यवस्था नसल्याचे शनिवारी उघड झाले. जगनाथ भगत या ७० वर्षीय नागरिकाचे काल सायंकाळी निधन झाले. त्यानंतर रात्री सात ते आठच्या दरम्यान रामकृष्ण विश्रामगृहाजवळ असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले. परंतु त्यावेळी तेथे लाईट नसल्याने अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अखेर नागरिकांनी मोबाइलचे टॉर्च सुरू केले. त्यानंतर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. या दुर्व्यवस्थेमुळे रहिवाशांनी व नागरिकांनी संताप व्यक्त केला.
“सद्यस्थितीत स्मशानभूमीत काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने येथील वीजपुरवठा खंडित केला आहे. वेळेत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागला. भविष्यात असा प्रकार होणार नाही याकडे नगर परिषद लक्ष देईल. याठिकाणी सोलरवरील दिवे बसवण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.” — अतुल चौगुले, नगराध्यक्ष, श्रीवर्धन




























































