
शहापूरच्या जलसंधारण विभागाचे उपअभियंता लक्ष्मण मंडळे यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथे पहाटेच्या सुमारास एका कारने जोरदार धडक दिल्याने मंडळे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र अपघातानंतर कारचालक फरार झाल्याने पोलिसांना संशय आला होता. त्यानुसार तपासाची सूत्रे वेगाने फिरवली असता मंडळे यांची पत्नी आणि मेहुण्याने कट रचून त्यांची हत्या केल्याचे उघड झाले असून दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
शहापूरातील मृद व जलसंधारण विभागात कार्यरत असलेले उपअभियंता लक्ष्मण मंडळे शहापूरात एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंब कराड येथे राहत असल्याने दर शुक्रवारी ते कराडला जात व सोमवारी शहापूरला येत असत. त्याप्रमाणे शुक्रवारी ५ जूनला ते संध्याकाळी कराड येथे जाण्यासाठी निघाले व शनिवारी पहाटे कराड येथे पोहोचले. कराड येथे एका कारचालकाने मंडळे यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र पोलिस तपासात मंडळे यांची पत्नी सुरेखा व मेहुणा संग्राम यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला असल्याचे उघड झाले.
कटात अन्य लोकांचा सहभाग
कराड पोलिसांनी याप्रकरणी पत्नी व मेहुण्याला ताब्यात घेतले असून या हत्येच्या कटात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.




























































