TMC चे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? के.सी. वेणुगोपाल म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना या सर्व दाव्यांना निव्वळ अफवा आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

नुकतीच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात, तसेच टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यात दिल्लीत भेट झाली होती. या भेटींनंतर दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते.

याबाबत स्पष्टीकरण देताना के.सी. वेणुगोपाल म्हणाले, “या केवळ अफवा आहेत. आमच्या संपर्क सचिवांनी कालच स्पष्ट केले आहे की, या गोष्टी पूर्णपणे निराधार आहेत. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची घेतलेली भेट ही केवळ एक नियमित चर्चा होती. इंडिया आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी आणि या लोकशाहीविरोधी सरकारविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी सर्वांचीच इच्छा आहे. त्या दृष्टीने आम्ही एकत्र पुढे जात आहोत, या भेटींमागे केवळ हाच उद्देश होता, दुसरे काहीही नाही.”