जाऊ शब्दांच्या गावा – …तेव्हा मिळते भाकर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे  [email protected]

अनेक कवींनी चंद्राला काय नि किती उपमा दिल्या आहेत, रूपकं वापरली आहेत, पण श्रमिकांचे कवी म्हणून ओळखले जाणारे नारायण सुर्वे आपल्या कवितेत म्हणतात, “दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दुःखात गेले, हिशोब करतो आहे, आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली.’’ कामगार वर्गाची व्यथा इतक्या समर्पक शब्दांत क्वचितच कुणी मांडली असेल. त्यातील ‘भाकरीचा चंद्र’ या शब्दांनी ती वेदना अधिक उठावदार केली आहे.

आदिम अवस्थेपासून आतापर्यंत माणसाची सगळी धडपड ही भाकरीसाठीच तर चाललेली आहे. मात्र काही जणांना आपल्या पुढील हजारो पिढय़ांची तरतूद आताच करायची असल्याने उरलेल्यांच्या या पिढीलाही पुरेशी भाकरी मिळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असो. तर या ‘भाकर’ किंवा ‘भाकरी’ या शब्दाविषयी कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, संस्कृतमधील ‘भ्रस्ज’ या शब्दापासून भाकरी शब्द आला. याची व्युत्पत्ती निरनिराळी दिली आहे. भास्करी म्हणजे सूर्यासारखी वाटोळी दिसते म्हणून, भक्ष्याहारी म्हणजे खाण्याचा पदार्थ म्हणून, परंतु या व्युत्पत्ती ग्राह्य नाहीत. भ्रस्ज म्हणजे भाजणे, भाकरी चुलीवर भाजून केली जाते म्हणून हे नाव पडलं असावं. म्हणून कवयित्री बहिणाबाईही म्हणतात, ‘‘आधी हाताला चटके, मग मिळते भाकर.’’ कुलकर्णींनी व्युत्पत्ती कोशाच्या पुरवणीत कानडी भाषेतही ‘भक्करि-रे’ किंवा ‘भक्रि’ असा शब्द असल्याचं म्हटलं आहे.

सुर्व्यांच्या कवितेत ‘भाकरीचा चंद्र’ हा शब्दप्रयोग येतो, तर ‘भाकरी’ शब्दाची व्युत्पत्ती सांगताना कोशकारांनी भाकरीचा आणि सूर्याचा वाटोळा आकार अधोरेखित केला आहे. या गोलाकार भाकरीमुळे काही म्हणी तयार झालेल्या आहेत – ‘भाकर मोडावी ते तोंड’. म्हणजे भाकरी कुठूनही मोडून खाता येते. तिच्या वाटोळ्या आकारामुळे तिला कुठंही तोंड पाडता येतं. एखाद्या गोष्टीची सुरुवात कुठूनही करता येते हे सुचवताना ही म्हण वापरली जाते. अशाच अर्थाची एक कोकणी म्हण आहे – ‘भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेना तें कळाना’. याचा अर्थ भाकरीचं तोंड कुठं असतं ते कळत नाही. वाटोळ्या वस्तूचा मुख्य भाग कळत नाही या अर्थाने ही म्हण वापरली जाते. भाकरीच्या आकारावरून दुसरी म्हण म्हणजे ‘भाकरीला तोंड नाही, भांडणाला मूळ नाही’. म्हणजे भाकरी कोणत्याही ठिकाणी मोडून खाल्ली तरी सारखीच लागते, त्याप्रमाणे भांडण केव्हाही व कसंही सुरू होतं.
माणसाला पोटासाठी काम करावं लागतं. त्यावरून ‘भाकरीची चाकरी’ अशी एक म्हण आहे. या म्हणीत ‘भाकरी’ हा शब्द पोटाची भूक या अर्थाने वापरला आहे. अन्नान्न करत फिरणं, अन्न न मिळणं या अर्थाने ‘भाकरीला महाग होणं’ म्हटलं जातं. ‘ज्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी’ ही म्हण तर सर्रास वापरली जाते. ‘भाकरी आसा ताका चाकरी नाका’ अशी एक कोकणी म्हण आहे. म्हणजे ज्याला खायला आहे तो दुसऱ्याची नोकरी कशाला करील?

भाकऱ्या भाजणं हे कमी प्रतीचं काम समजलं जातं. अशा हलक्या कामांसाठी ‘भाकरी भाजायला लावणं’ हा शब्दप्रयोग वापरला जातो, पण सर्रास वापरला जाणारा वाक्प्रयोग म्हणजे ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणं’. पूर्वी ज्या गावी लष्कराचा तळ असे त्या गावच्या लोकांना शिपायांची कामं करावी लागत. त्यांच्यासाठी भाकऱ्या करून द्याव्या लागत. यावरून आपला ज्या कामाशी अर्थाअर्थी संबंध नाही अशी कामं करणं, नसत्या उठाठेवी करणं या अर्थाने ही म्हण वापरली जाते.

काही लोकांना अशक्य वाटणाऱ्या दोन परस्पर विरोधी गोष्टी एकाच वेळी हव्याशा वाटतात. अशा अतार्किक लोकांसाठी एक खास म्हण आहे – ‘भाकर खाईन व ती तशीच शिल्लक ठेवीन’. खरं तर असं करणं कठीणच काय, अशक्यच नव्हे का?

भाकरीचा एक खेळही आहे, अनेकांनी तो लहानपणी खेळलाही असेल. या खेळात एक चपटा दगड घेऊन तो तळ्याच्या अगर नदीच्या काठावर उभं राहून सरपटता फेकायचा. तो पाण्यात ज्या ठिकाणी बुडेल तिथं पाण्याच्या वर्तुळाकार आकृत्या तयार होतात. त्या गोलाकार आकृत्यांनाच भाकऱ्या म्हटलं जातं. भाकरीच्या वर्तुळाकारावरून हे नाव पडलं असावं. प्रत्येकाच्या या भाकऱ्या किती होतात त्या मोजून त्याप्रमाणे डाव खेळला जातो.

भाकरी ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ या धान्यांची असते. भाकरीप्रमाणेच गोलाकार असणारा दुसरा पदार्थ म्हणजे चपाती किंवा पोळी. त्याची माहिती पुढील लेखात घेऊ.