
राज्यात अकरावी प्रवेश प्रकिया सुरू आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱया फेरीसाठी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राज्यभरातील 6 लाख 80 हजार 786 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवले आहेत. तसेच दुसऱया फेरीसाठी दिलेल्या मुदतीत 1 लाख 25 हजार 690 विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज भरले आहेत. दुसरी प्रवेश यादी 13 जून रोजी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्यातील 9 हजार 649 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसऱया नियमित फेरीसाठी 6 ते 9 जून रोजी सायंकाळी 6 पर्यंत नव्याने विद्यार्थी नोंदणी, प्रवेश अर्जाच्या भाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-2 मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार 6 ते 9 जून या कालावधीमध्ये 1 लाख 25 हजार 690 विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज भरले. त्यामुळे आतापर्यंत अर्ज नोंदणी करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 13 लाख 68 हजार 775 इतकी झाली. तसेच या कालावधीत राज्यातील 6 लाख 80 हजार 786 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरून आपले अर्ज निश्चित केले. अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय वाटप यादी 13 जून रोजी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई विभागातून सर्वाधिक विद्यार्थ्यांचे पसंतीक्रम नोंदवले गेले आहेत. याआधी पहिल्या फेरीत 3 लाख 72 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. पहिली फेरी 29 मे ते 3 जून कालावधीत राबविण्यात आली होती. या फेरीसाठी जागा वाटप झालेल्या 4 लाख 63 हजार 220 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 72 हजार 306 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला.
विभागनिहाय पसंतीक्रम नोंदविलेली संख्या
|
विभाग |
विद्यार्थी संख्या |
| अमरावती | 65,153 |
| छत्रपती संभाजीनगर | 76,318 |
| कोल्हापूर | 66,480 |
| लातूर | 40,792 |
| मुंबई | 1,73,223 |
| नागपूर | 56,773 |
| नाशिक | 80,733 |
| पुणे | 1,18,615 |
| इतर | 2,699 |
| एकूण | 6,80,786 |




























































