
इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जगावर आर्थिक अस्थिरतेचे सावट असताना आता या युद्धाचा फटका हिंदुस्थानातील रियल इस्टेटलाही जबर बसला आहे. मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता अशा एकूण सात मोठय़ा शहरांतील जवळपास 5 लाख 40 हजार फ्लॅट्सच्या वितरणाची प्रक्रिया सध्या लटकली आहे.
इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध अद्याप थांबले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून सिमेंट, सळई आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे देशातील प्रमुख सात शहरांमध्ये विक्रमी संख्येने घरांचा ताबा मिळवण्याच्या योजनांना मोठा धक्का बसला आहे. रियल इस्टेट सल्लागार कंपनी अनारॉकच्या अहवालानुसार, 2021 ते 2023 यादरम्यान सुरू झालेले निवासी प्रकल्प आता बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहेत.
मुंबईत सर्वात जास्त फ्लॅट
या अहवालानुसार, एकटय़ा मुंबईत जवळपास 2 लाख 7 हजार 300 फ्लॅट, पुण्यात 1 लाख 300 फ्लॅटची डिलिव्हरी लटकली आहे. बंगळुरूमध्ये 69 हजार, हैदराबादमध्ये 63,700 आणि चेन्नईत 35,600 असे मिळून एकूण 1 लाख 68 हजारांहून जास्त फ्लॅट्ची विक्री अद्याप होणे बाकी आहे. 2020 मध्येही या शहरांमध्ये 4 लाख 66 हजार घरांची डिलिव्हरी होणार होती, परंतु 2 लाख 14 हजार डिलिव्हरी झाली होती.




























































