
पैशाच्या वादातून सहा जणांनी मिळून एका तरुणाची कुडाळ येथील हॉटेलात मारहाण करून हत्या केली. मग मृतदेह त्याच्या दुचाकीसह फोंडाघाटातील खोल दरीत फेकून देत अपघात झाल्याचे चित्र उभे केले. पाच वर्षे हे कृत्य पद्धतशीर लपवले गेले, पण मुंबई गुन्हे शाखेने या गुह्याचा छडा लावत या गुह्यातील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सोलापूरच्या माळशिरस येथे राहणारा आशपाक मुलाणी ऊर्फ निहाल याचा डिसेंबर 2021 मध्ये फोंडाघाटातील दरीत दुचाकीसह मृतदेह सापडला होता. तेव्हा त्याची अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान मुंबई गुन्हे शाखा युनिट-7 चे वरिष्ठ निरीक्षक आण्णाजी सावंत यांना खबर मिळाली की अशपाक नावाच्या तरुणाचा अपघात नाही तर त्याची हत्या करून मृतदेह दरीत फेकण्यात आला होता. शिवाय त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचून तसे चित्र रचण्यात आले होते. अशपाकची हत्या करणारे चौघेजण ठाणे, नवी मुंबई परिसरात आहेत. त्यानुसार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. धनाजी साठे, महेश शेलार, स्वप्नील काळे, उपनिरीक्षक प्रभाकर, अरुण सावंत व पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला. मानवी कौशल्य व तांत्रिक बाबींच्या आधारे मनोज भडंगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिष मोरे आणि ऋतुराज शेट्टी अशा चौघांना ठाणे व नवी मुंबईतील विविध ठिकाणांहून पकडण्यात आले.
हॉटेलात बोलावून काटा काढला
अशपाक व अटक आरोपी हे पार्टनरशिपमध्ये काम करत होते. पैशांवरून त्यांच्यात वाद झाला होता. डिसेंबर 2021 मध्ये कुडाळ येथील एका हॉटेलात अशपाक भेटण्यासाठी पोहचला. आरोपी व त्यांच्यात पैशांवरून चर्चा झाली, पण ती फिस्कटली. तेव्हा आरोपींनी त्याला मारहाण करून ठार मारले. मग रात्री त्याचा मृतदेह दुचाकीसह फोंडाघाटात फेकून दिला.


























































