
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा न दिल्यास आम्ही दिल्लीत 20 जूनला पुन्हा आंदोलन करणार आहोत. त्यासाठी आम्ही जेलमध्येही जायला तयार असल्याचा इशारा, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गुरूवारी कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग, ऍड. असिम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी, राहूल डंबाळे, कुलदीप अंबेकर, नितीन आंधळे यांच्यासह अनेक विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अभिजित दीपके म्हणाले, नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या तब्बल 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी देशात मागील दोन वर्षांत आत्महत्या केल्या आहेत. आपल्या देशात विद्यार्थ्यांचे मूल्य कमी असून, जोपर्यंत आपण बोलणार नाही, तोपर्यंत हे लोक सर्वांनाच गृहित धरणार आहेत. 40 वर्षांपासून बेरोजगारी असून, आपण शिक्षण, नोकरी, मागितल्यास आपल्याला खड्डेयुक्त रस्ते, पडणारे पुल मिळत आहेत, असे दिपके म्हणाले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग म्हणाले, उज्ज्वल भविष्याकडे जायचे असल्यास शिक्षण आणि पर्यावरणाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनभूमीतून हे आंदोलन उभे राहिल्यामुळे आनंद झाला आहे. सद्यस्थितीत देशात शिक्षण क्षेत्रात अंधकार निर्माण झाला असून, आपण काय करतो आहे, विद्यार्थी कुठे जाणार, विविध परीक्षा व्यवस्थित झाल्या पाहिजेत, याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. दिल्ली, पुणे, अमृतसरसह विविध ठिकाणी लोक एकत्रित येत असून, हीच आपली ताकद आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला सजग राहावे लागणार आहे. त्यासाठी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करा. न्याय मिळाला पाहिजे हाच आमच्या आंदोलनाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जातीय तेढ वाढवून फक्त बेरोजगारी वाढवली
काय चाललं आहे या देशात. जगात एआय, नॅचरल एनर्जी यावर शिक्षणाच्या माध्यमातून प्रयोग, संशोधन सुरु आहे. आपण फक्त हिंदु-मुसलमान वाद – विवाद करत बसलो आहोत. या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात पुण्यातून सुरू झाली आहे. मी पुण्यात शिकलो असून, होम ग्राउंडवर आंदोलनाची गर्दी राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. लखनऊ, अमृतसर, बंगळुरूवरुन दिल्लीत हे आंदोलन होईल. आम्ही जेलमध्ये जाऊ पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊच असा निग्रह दिपके यांनी केला.




























































