
हिंजवडीतील टीसीएस या आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने कंपनीतील दोन महिला कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. टीसीएस कंपनीतील या घटनेने पुन्हा एकदा आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सततचा मानसिक छळ, खोट्या तक्रारी आणि कामाच्या ठिकाणी होणारा अपमान यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख संबंधित कर्मचाऱ्याने सुसाइड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीसह टीसीएसमधील दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित अभय ब्रह्मे (48) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विनोद जेठालाल पालीचा तसेच हिंजवडीतील टीसीएस कंपनीतील अर्चना आणि शाश्वती या दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित ब्रह्मे यांनी 2 जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. टीसीएसच्या डीईजी प्रकल्पात कार्यरत असलेल्या अर्चना आणि शाश्वती या महिला कर्मचाऱ्यांकडून अमित ब्रह्मे यांना सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यांच्या हातातील महत्त्वाचे प्रकल्प काढून घेणे, अपरिचित कामे सोपविणे, सर्वांसमोर अपमान करणे, नोकरी सोडण्याचा सल्ला देणे तसेच कामाबाबत नकारात्मक अभिप्राय देण्याची धमकी देणे, अशा प्रकारे त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात येत होता, असा आरोप करण्यात आला आहे.





























































