
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले रद्द केल्याचे जाहीर केले असून, तेहरानच्या नेतृत्वाने युद्ध संपवण्यासाठी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि इस्लामिक रिपब्लिकच्या अणुकार्यक्रमावर ६० दिवसांची चर्चा सुरू करणे यांबाबतच्या एका कराराच्या मसुद्याला ‘मंजुरी’ दिली असल्याचा दावा केला आहे. मात्र ट्रम्प यांनी आधी प्रमाणेच आताही एकतर्फी दावा केल्याचे दिसत आहे. इराणच्या ‘फार्स’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने अमेरिकेसोबतच्या कोणत्याही कराराच्या मसुद्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही, परंतु इराणने स्वाक्षरी करण्याचा विचार करण्याची ‘शक्यता’ असल्याचे म्हटले आहे.
सध्या चर्चेत असलेला हा शांतता करार होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आणि अमेरिकेची नाकेबंदी उठवण्यासाठी आहे, परंतु इराणचा अणुकार्यक्रम आणि अमेरिकेने लादलेले निर्बंध उठवण्याबाबतच्या कोणत्याही करारासाठी पुढील चर्चेची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. इराणने करारावर सही केल्याचे जाहीर केल्यानंतरच खऱ्याअर्थाने युद्ध संपल्याचे स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.





























































