अहमदाबाद विमान दुर्घटनेला 1 वर्ष,  कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला, हवाई सुंदरी मैथिलीच्या कुटुंबाला सरकारने मदतीचा छदाम दिला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबाद विमान दुर्घटनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या अपघातात हवाई सुंदरी असलेली उरणची मैथिली पाटील हिचाही मृत्यू झाला होता. यानंतर अनेक आमदार, खासदार, राजकीय पुढार्‍यांनी मैथिलीच्या कुटुंबीयांची भेट घेत आश्वासनांचा पाऊस पाडला. सरकारनेही आर्थिक मदत जाहीर केली. मात्र घटनेला वर्ष उलटले तरी सरकार किंवा अन्य कोणी मदतीचा छदाम दिला नसल्याची खंत तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. मैथिलीच्या आठवणीने यावेळी कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांधच फुटला.

१२ जून २०२५ रोजी एअर इंडियाचे २४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादहून लंडनकडे निघालेले बोईंग- ७८७ हे विमान काही सेकंदांतच दुर्घटनाग्रस्त झाले. या विमान दुर्घटनेत १२ क्रू मेंबर्ससह एकूण २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये न्हावा गावातील कृष्णभक्त हवाई सुंदरी २३ वर्षीय मैथिली पाटीलचाही समावेश होता. आई-वडिलांसह पाच सदस्यीय कुटुंबातील मैथिली कमवती होती. विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशी कुटुंबीयांसोबत पूर्ण दिवस घालवल्यानंतर मैथिली गुरुवारी सकाळीच मुंबईमार्गे अहमदाबाद येथील एअरपोर्टला रवाना झाली होती. परंतु काही तासांतच लंडन येथे जाणाऱ्या विमान दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.

१७ जून २०२५ रोजी मैथिलीला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आल्यानंतर सांत्वनासाठी १२-१५ दिवस विविध राजकीय पक्ष, नेते, पुढार्‍यांच्या अगदी लाटा उसळलेल्या होत्या. प्रत्येक जण आपापल्या परीने आश्वासने देत होता. सरकारनेही आर्थिक मदत जाहीर केली. मात्र एखादा अपवाद वगळता कुणाकडूनही आर्थिक मदत मिळाली नाही. शासकीय मदतीचा तर छदामही मिळालेला नसल्याची माहिती मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील यांनी दिली.

कर्ज काढून शिक्षण घेण्याची वेळ

मैथिली गेल्यानंतर पाटील कुटुंबाचा आर्थिक आधारच हरपला आहे. त्यामुळे एमटेकचे शिक्षण घेत असलेली मुलगी व अकरावीतील शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे लागले. मैथिलीच्या जीवापेक्षा पैशांचे मोल नाही. पैशांनी त्याची भरपाईही होऊ शकणार नाही असे सांगत कुटुंबीयांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.