
आरएसएस प्रमुख मोहन भागवत प्रवास करत असलेल्या स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक केल्याची घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे घडली. ही गाडी लखनऊहून दिल्लीला चालली होती. या घटनेत एका एसी डब्याची काच फुटली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेन क्रमांक 12003 ही गुरुवारी सायंकाळी लखनऊहून नवी दिल्लीकडे जात होती. इटावा-टुंडला रेल्वे मार्गावर फिरोजाबाद आणि माखनपूर दरम्यान सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ट्रेनच्या ई1 या एसी डब्यावर दगडफेक केली. यात आसन क्रमांक 53-54 च्या बाहेरील काच फुटली. याच डब्यातून आरएसएस प्रमुख मोहन भागवत कानपूरहून प्रवास करत होते. एका कार्यक्रमासाठी मोहन भागवत हे कानपूरहून दिल्लीला प्रवास करत होते.
दगडफेकीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक आदित्य लाघा, पोलीस अधीक्षक (रेल्वे) अनिल झा, पोलीस अधीक्षक (शहर) रवी शंकर प्रसाद आणि आरपीएफ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ट्रेनची तपासणी केल्यानंतर उशिरा ट्रेन दिल्लीकडे रवाना करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, तपास पूर्ण होऊन अहवाल सादर झाल्यानंतरच पुढील माहिती दिली जाईल.





























































