
हेल्परच्या नोकरीसाठी रशियात गेलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणाची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. चांगल्या नोकरीचे आमिष दाखवत आझमगड आणि मऊ जिल्ह्यांतील अनेक तरुण एजंटांच्या सांगण्यावरून 2024 मध्ये रशियात गेले. मात्र दोन वर्षांनंतर दोन तरुणांचे अवशेष घरी आले.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणांना गार्ड आणि हेल्पर म्हणून नोकरी देण्याचे आमिष देण्यात आले. मात्र रशियात पोहचल्यावर त्यांना लष्करी प्रशिक्षणासाठी कथितरित्या भाग पाडत युद्धभूमीवर पाठवण्यात आले. युद्धात दोन तरूणांचा मृत्यू झाला. दोन वर्षांनंतर त्यांचे अवशेष मायदेशी परत आले आहेत.
आझमगड शहरातील गुलाम का पुरा येथील रहिवासी अझरुद्दीन आणि मऊ जिल्ह्यातील रहिवासी रामचंद्र यांचे अवशेष गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. दोघेही बऱ्याच काळापासून बेपत्ता होते. डीएनए चाचणीद्वारे त्यांच्या मृतदेहांची ओळख पटल्यानंतर त्यांचे अवशेष रशियातून हिंदुस्थानात पाठवण्यात आले होते.
दोघे तरुण जानेवारी 2024 मध्ये रोजगाराच्या शोधात एजंटांच्या संपर्कात आले होते. मऊ येथील एका एजंटने त्यांना रक्षक आणि मदतनीस म्हणून नोकरीचे आमिष दाखवून रशियाला बोलावले, असा कुटुंबीयांनी आरोप केला आहे. तिथे पोहोचल्यावर तरुणांना कथितरित्या युद्धक्षेत्रात पाठवण्यात आले. या काळात अनेक जण जखमी झाले, काही परत आले, तर काही बेपत्ता झाले.
अझरुद्दीन 27 जानेवारी 2024 रोजी रशियाला गेला आणि बेपत्ता झाला. त्यानंतर कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. अझिमुद्दीनच्या भावाने सौदी अरेबियातील नोकरी सोडून भावाच्या शोधात हिंदुस्थान आणि रशियातील विविध सरकारी कार्यालये आणि दूतावासांना भेटी दिल्या. अथक प्रयत्नांनंतर आणि सरकारी मदतीने, अखेरीस त्याच्या भावाचे पार्थिव मायदेशी आणण्यात आले.
हे मोठे रॅकेट असून, नोकरीचे आमिष दाखवून युद्धक्षेत्रात बोलावण्यात येते, असा आरोप मयत तरुणांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी निष्पक्ष चौकशीची आणि जबाबदार एजंटांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच मयत तरुणांच्या थकीत पगाराची आणि इतर आर्थिक मागण्यांचीही मागणी केली.




























































