पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतमातेच्या सुपुत्रांनाही वाचवू शकत नाही, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात गेल्या तीन दिवसांत व्यापारी जहाजांवर झालेल्या अमेरिकन हल्ल्यांमध्ये तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणावर पंतप्रधानांनी ब्र सुद्धा उच्चारलेला नसल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वरून केंद्र सरकारला लक्ष्य केले.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात तीन दिवसांत तीन जहाजांवर झालेल्या अमेरिकन हल्ल्यांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला. मात्र याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्दही बोललेला नाही.

परदेशी शक्तीने एखाद्या भारतीयाचा जीव घेतला तर पंतप्रधानांनी त्यावर भूमिका मांडणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात पंतप्रधानांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

जी-7 परिषदेत मोदींवर निशाणा

राहुल गांधी यांनी आगामी जी-7 परिषदेलाही लक्ष्य केले. पुढील आठवड्यात जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जाणार आहेत. भारतीय खलाशांच्या मृत्यूला काहीच दिवस झाले असताना तेथे जाऊन ते जागतिक नेत्यांशी हस्तांदोलन करतील, चर्चा करतील आणि करार करतील; मात्र मृत भारतीयांबाबत त्यांच्याकडे बोलण्यासाठी एक शब्दही नसेल, असा आरोप त्यांनी केला.

‘भारतीयांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवावा’

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींना ‘Compromised PM’ असे संबोधत टीका केली. ज्यांच्यामुळे भारतीय खलाशांचा मृत्यू झाला, त्यांच्याविरोधात बोलण्याचे धैर्य आणि ताकद पंतप्रधानांमध्ये नाही, असा आरोप त्यांनी केला.

भारतमातेच्या मुलांचे संरक्षण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारने ठाम भूमिका घ्यावी आणि या घटनेबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.