
मे महिन्यात हिंदुस्थानचा किरकोळ दर वाढून ३.९३% वर पोहोचला आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या वाढत्या किमती हे यामागचे मुख्य कारण आहे. याशिवाय आखाती देशांमधील संघर्षामुळे किमतींवर दबाव कायम असून महागाईबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महागाईची ही आकडेवारी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा सरकारी इंधन कंपन्यांनी केवळ मे महिन्यातच तब्बल चार वेळा इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. दुसरीकडे खाद्यपदार्थांचा महागाई दर एप्रिलमधील ४.२० टक्के आणि मागील वर्षाच्या नीचांकी पातळीवरून वाढून मे महिन्यात ४.७८ टक्के झाला आहे.
वाहतूक क्षेत्रातील महागाई दरात वाढ
वाहतुकीशी संबंधित महागाई दर एप्रिलमधील ०.०१ टक्क्यांच्या घसरणीवरून मे महिन्यात १.७५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. हा इंधनाच्या वाढलेल्या किरकोळ किमतींचा थेट परिणाम दर्शवतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती आणि कमकुवत मान्सूनच्या शक्यतेमुळे रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी आपला महागाईचा अंदाज ४.६ टक्क्यांवरून ५.१% टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यासोबतच रुपया आणि चालू खात्यातील तुटीशी संबंधित धोकेही वाढले आहेत.
काय झाले महाग?
- इंधन आणि गॅस: सर्वात आधी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या, त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही वाढले. ज्याचा मोठा परिणाम व्यापारावर झाला आहे. अलीकडेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
- दैनंदिन वस्तू: दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. दूध आणि ब्रेडच्या किमतीतही वाढ झाली आहे.
या सर्व सातत्यपूर्ण दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडून गेले आहे.




























































