
अहमदाबाद एअर इंडिया दुर्घटनेला आज एक वर्ष झाले आहे. यावरच प्रतिक्रिया देताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुर्घटनेच्या कारणांचा बारकाईने आणि निष्पक्षपणे शोध घेण्यासाठी तसेच विमान वाहतूक सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले. एनडीटिव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, एअर इंडियाच्या AI-१७१ विमान दुर्घटनेचा तपास अद्याप सुरू आहे. तपास यंत्रणा या दुर्घटनेमागील कारणे शोधण्यात गुंतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना रोखण्यावर आणि विमान वाहतूक सुरक्षा अधिक मजबूत करण्यावरही भर दिला जात आहे.
एअर इंडिया फ्लाइट AI-१७१ दुर्घटनेच्या तपास अहवालाबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने सांगितले की, ही संपूर्ण प्रक्रिया हिंदुस्थानच्या विमान अपघात आणि घटना तपास नियम, २०१७ आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनाच्या निर्धारित मानकांनुसार केली जात आहे. ब्युरोनुसार, १२ जुलै २०२५ रोजी या दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल जारी करण्यात आला होता आणि गेल्या वर्षभरात तपास पथकाने या दुर्घटनेशी संबंधित सर्व पैलूंची- जसे की तांत्रिक, परिचालन, संस्थात्मक आणि मानवी- सखोल चौकशी केली आहे.
दरम्यान, एअर इंडियाचे बोईंग विमान लंडनला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत विमानात असलेल्या २४१ लोकांचा आणि जमिनीवर असलेल्या १९ लोकांचा मृत्यू झाला होता.




























































