Yavatmal News आभाळ कोसळलं अन् होत्याचं नव्हतं झालं; वीजेच्या तडाख्यात मेंढपाळासह १३ बकऱ्यांचा मृत्यू.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वणी तालुक्यातील टाकळी गावाजवळ शुक्रवारी (दि. १२) दुपारी वीज कोसळून एका मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याच्यासोबत असलेल्या १३ बकऱ्यांचाही जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, विलास तुमराम हे नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्या चारण्यासाठी शेतशिवारात गेले होते. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस व वादळी वारा सुरू झाला. याचदरम्यान जोरदार कडकडाटासह वीज कोसळली.

वीजेचा तडाखा बसल्याने विलास तुमराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या जवळ असलेल्या १३ बकऱ्यांचाही जागीच मृत्यू झाला. घटना इतकी अचानक घडली की, त्यांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विजेच्या तडाख्यामुळे मृतावस्थेत पडलेले मेंढपाळ आणि बकऱ्या पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. या घटनेनंतर टाकळी गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, महसूल विभाग व संबंधित प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्यात येत असून मृताच्या कुटुंबीयांना तसेच पशुधनाच्या नुकसानीबाबत तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अचानक घडलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.